Tue, Apr 23, 2019 09:35होमपेज › Ahamadnagar › आमच्या नादाला लागू नका : प्रताप ढाकणे 

आमच्या नादाला लागू नका : प्रताप ढाकणे 

Published On: May 27 2018 1:16AM | Last Updated: May 26 2018 11:24PMपाथर्डी : शहर प्रतिनिधी

तुमचा कारखाना 15 कोटी रुपयांवर एनपीएमध्ये होता. सोयर्‍या-धायर्‍यांच्या हाता-पायापडून 25 कोटींचे कर्ज मिळवले. 15 कोटी एनपीए भरून 10 कोटी रुपये पुन्हा हंगामासाठी भांडवल वापरले. आमदारकीचा दबाव वापरून खरेदी विक्री संघाच्या गैरव्यवहाराबद्दल गुन्हा दाखल होऊ देत नाही. आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नसून सीबीआय चौकशीलाही तयार आहोत. आमच्या नादाला लागू नका, असा इशारा केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी आ. मोनिका राजळे यांचे नाव न घेता इशारा दिला.

तालुका बाजार समितीच्या मुद्यावरून ढाकणे-राजळे गटात जोरदार संघर्ष सुरू झाला असून ढाकणेंच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीच्या जागेवरील बांधकामावरून आंदोलने झाली. चार दिवसांपूर्वी राजळे समर्थक कार्यकर्त्यांनी प्रोसिडींगच्या नकला मिळाव्यात म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयात आंदोलन केले. या आंदोलनानंतर ढाकणे यांनी पत्रकार परिषद घेऊन बाजार समितीच्या प्रगतीचा आढावा घेत राजळे गटावर जोरदार हल्ला चढवला. आगामी काळात अनेक भानगडी बाहेर काढण्याचा इशारा दिला. यावेळी बाजार समितीचे सभापती बन्सीभाऊ आठरे, संचालक बाळासाहेब घुले, वैभव दहिफळे, राजेंद्र गर्जे, नगरसेवक बंडू बोरुडे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सीताराम बोरुडे, विश्वनाथ बडे, बाजार समितीचे सचिव दिलीप काटे, सहाय्यक सचिव डी. बी. सपकाळ आदी उपस्थित होते. 

ढाकणे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. तूर खरेदी घोटाळा, भूखंड वाटप, गाळे वाटप असे घोटाळे फोल ठरले. विरोधकांना आमच्या ताब्यात सत्ता असल्याचे देखवत नाही.केवळ राजकीय हेतूने आरोप करून लोकांची दिशाभूल करतात. तुमच्या अंधाराबाबतचे पुरावे लोकांपुढे आणू. आमच्या विरोधात सत्याग्रहाला बळजबरीने बसवलेल्या कार्यकर्त्यांनी रात्री फोन करून आम्हाला बसवले गेले, तसे आदेश होते असे सांगितले. आंदोलकांनी केलेली अतिक्रमणे जिरविण्यासाठी हा सर्व खटाटोप नेत्यांकडून सुरू आहे. संस्था खलास झाल्या तरी चालतील, आमचे राजकारण टिकले पाहिजे, यासाठी बदनामीचे तंत्र सुरू आहे. आम्ही कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहोत. सीबीआय चौकशी लावा. त्यालाही तयारी आहे.

मार्केट कमिटी स्थापन झाल्यापासूनचा बारा लाख रुपये तोटा होता. तो भरून काढून 27 लाख रुपये आवश्यक खर्च केला. आजमितीला 1 कोटी 14 लाख 53 हजार रुपये नफ्यात संस्था आहे. त्यामुळे संस्था कशी चालवयाची, याची अक्कल तुम्ही आम्हाला शिकवू नका. तुमच्या ताब्यातील एका-एका संस्थेचे बाड बाहेर काढतो. तुमचा उद्योग बाहेर काढतो. मार्केट कमिटीच्या जागेवर केलेली तुमच्या पिलावळीची अतिक्रमणे काढा. 30 तारखेपासून सहाय्यक निबंधकांच्या दारात बैठा सत्याग्रह करून तालुका संघाच्या गैरकारभाराविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही करणार आहोत.

वॉटरकप स्पर्धेमध्ये श्रमदान आम्ही सुद्धा केले. बाजार समितीने काही गावांना आर्थिक मदतही केली. तुमचे स्वत:चे योगदान काय? तुम्ही काय केले? फोटो काढून मिरवून घेतले. एक रुपया सुद्धा कुठे दिला नाही. वर्षभर तरी टिका-टिप्पणी नको म्हणून आम्ही शांत बसलो, याचा सोईचा अर्थ लावून एक-एक कुरपती सुरू केला. नादाला लागू नका, इशारा ढाकणे यांनी दिला. तसेच तालुक्यातील मिरी येथे उपबाजार समिती व जनावरांच्या बाजारासाठीचे तांत्रिक काम पूर्ण होत आले असून पुढील महिन्यात बाजार सुरू होईल. त्यामुळे घोडेगावच्या बाजारावरील ताण कमी होऊन तालुक्याच्या दुर्गम अशा पश्चिम भागाचा विकास होणार आहे. व्यापारी गाळ्यांचे पाथर्डीचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे ढाकणे म्हणाले.