Fri, Jul 19, 2019 05:05होमपेज › Ahamadnagar › ‘त्या’ खासगी सावकारीचा सूत्रधार एकच?

‘त्या’ खासगी सावकारीचा सूत्रधार एकच?

Published On: May 14 2018 1:42AM | Last Updated: May 14 2018 12:27AMनगर : प्रतिनिधी

उद्योजक बाळासाहेब पवार यांना पैशासाठी त्रास देणारे खासगी सावकार हे बुरुडगाव रोड परिसरातील होते. वाळकी येथील उमेश कासार यांना विष घेण्यास प्रवृत्त करणारा सावकार हा बुरुडगाव येथील रहिवाशी आहे. या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींचा एकमेकांशी संबंध असून, त्यांना पैसे पुरविणारा सूत्रधार एकच असल्याचा संशय पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे. ओम उद्योग समूहाचे मालक बाळासाहेब पवार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक केलेला खासगी सावकार नवनाथ वाघ हा बुरुडगाव रोड परिसरातील आहे. तो पवार यांच्या पेट्रोलपंपावरील पैशाचा गल्ला सायंकाळी घेऊन जात होता. त्याच्यासह इतरांच्या त्रासाला कंटाळून पवार यांनी डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. अटक केलेल्या वाघ याची परिस्थिती पाहता तो कोट्यवधी रुपयांची सावकारी करीत असेल का, अशी साशंकता होती. त्याला कोणीतरी दुसरेच पैसे पुरवत असल्याची शक्यता आहे. परंतु, पोलिस आतापर्यंत तेथे पोहोचू शकले नाहीत. 

सावकाराच्या जाचास कंटाळून पवार यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच वाळकी येथील उमेश कासार यांनीही विषारी औषध प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तातडीने झालेल्या वैद्यकीय उपचारामुळे कासार हे बचावले आहेत. या गुन्ह्यातील आरोपी संकेत कुलट हा बुरुडगाव येथील रहिवाशी आहे. त्याचे वाघ याच्याशी कनेक्शन असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे. दोघेही वसुली पंटर म्हणून काम पाहत असावेत. त्यांना रसद पुरविणारा दुसराच कोणीतरी असल्याची शक्यताही आहे. मात्र, वाघ व कुलट यांना रसद पुरविणारा कोण, हे अद्याप उघडकीस आलेले नाही. पोलिस यंत्रणा अजून सूत्रधारापर्यंत पोहोचू शकली नाही. बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सखोल तपास करुन सत्य बाहेर आणण्याची मागणी होत आहे..

..ती व्यक्ती कोण?

आरोपी नवनाथ वाघ व संकेत कुलट हे इतके प्रभावी आहेत का, की ते एखादा उद्योजक अथवा शेतकर्‍याच्या मनात आत्महत्येचा विचार करण्याइतपत त्रास देऊ शकतात? या दोघांना नगर शहर किंवा परिसरातील प्रभावी व्यक्तीची रसद असल्याशिवाय हे शक्यच नसल्याचे चर्चा खासगीत व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ती प्रभावी व्यक्ती कोण, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे.