Mon, Mar 25, 2019 09:10होमपेज › Ahamadnagar › मलनिस्सारण, भुयारी गटारसाठी जादा दराच्या निविदेचे ‘अमृत‘!

मलनिस्सारण, भुयारी गटारसाठी जादा दराच्या निविदेचे ‘अमृत‘!

Published On: Mar 16 2018 12:44AM | Last Updated: Mar 16 2018 12:44AMनगर : प्रतिनिधी

महापालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प व भुयारी गटार योजनेच्या कामासाठी मागविण्यात आलेल्या निविदा तांत्रिक तपासणीनंतर काल (दि.15) उघडण्यात आल्या. यात दोनही निविदाकारांनी जादा दराची निविदा दाखल केल्याचे पुढे आले आहे. सदरच्या निविदा मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार असून त्यांच्या मंजुरीनंतरच निविदा मंजुरीसाठी ‘स्थायी समिती’कडे सादर केला जाणार आहे.

केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत मलनिस्सारण प्रकल्पासाठी 134 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. महापालिकेने तयार केलेल्या प्रकल्प अहवालानुसार 124 कोटींच्या कामासाठी दोन-तीन महिन्यांपूर्वीच निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र, निविदाकारांची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे कारण देत ‘एमजीपी’ने तांत्रिक छाननीतच या निविदा फेटाळल्या होत्या. त्यानंतर पुन्हा नव्याने निविदा मागविण्यात आल्या. यात ड्रीम कन्स्ट्रक्शन व दास ऑफशोर इंजिनिअरींग या दोन कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून या निविदांची तांत्रिक छाननी ‘एमजीपी’कडे रखडली होती. मंगळवारी (दि.13) सायंकाळी एमजीपीकडून तांत्रिक मंजुरी देण्यात आल्यानंतर महापालिकेत काल निविदांचे व्यापारी लिफाफे उघडण्यात आले. यात ड्रीम कन्स्ट्रक्शनची 3 टक्के तर दास ऑफशोरची 7 टक्के वाढीव दराची निविदा असल्याचे पुढे आले आहे.

राज्य शासनाने योजना मंजूर करतांनाच जादा दराची निविदा मंजूर करु नये, असे स्पष्ट बजावले आहे. त्यामुळे निविदाकारांशी ‘वाटाघाटी’ होऊन अंदाजपत्रकीय दराने काम करणार्‍या संस्थेची निविदा मंजूर करण्याची शिफारस एमजीपीकडून केली जाऊ शकते. एमजीपीकडून निविदांच्या दरांबाबत मंजुरी आल्यानंतर मनपा प्रशासन निविदा मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर करणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या निविदांची तांत्रिक छाननी महिनाभर रखडली होती. यात एका कंपनीची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांच्याकडून कागदपत्रे मागवून त्यांच्या निविदेला तांत्रिक मंजुरी देण्यात आल्याची चर्चा आहे. यापूर्वीची प्रक्रिया कागदपत्रांच्या पूर्ततेअभावीच रद्द करण्यात आली असतांना या प्रक्रियेत छाननी दरम्यान कागदपत्रांची पूर्तता करुन घेण्यात आली असेल, तर ही निविद प्रक्रियाही वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहे.