Sun, Mar 24, 2019 08:46होमपेज › Ahamadnagar › टेम्पो उलटून मजुराचा मृत्यू

टेम्पो उलटून मजुराचा मृत्यू

Published On: May 18 2018 1:13AM | Last Updated: May 17 2018 11:00PMनगर : प्रतिनिधी

नगर-दौंड रस्त्यावर अरणगावजवळील पुलावर 407 टेम्पो उलटून झालेल्या अपघातात मजुराचा मृत्यू झाला. मजुराची पत्नी अपघातात गंभीर जखमी झाली आहे.सद्ध्या या रस्त्याचे काम सुरू असून, दोन्ही बाजुने रस्ता खोदण्यात आला आहे. रस्त्यावर कुठेही दिशादर्शक फलक, बॅरिकेट्स लावण्यात आलेले नाहीत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ठेकेदार कंपनीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्या खोदून ठेवल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर इंडिकेटर, बॅरिकेट्स लावलेले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अंदाज न आल्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. 

बुधवार (दि.16 मे) सायंकाळी अंधार पडण्याच्या सुमारास पुलावरून दुधाचा टेम्पो जात होता. अंधार पडण्याच्या वेळी टेम्पो चालकाला रस्त्याच्या कडेला खोदलेले खड्डे दिसले नाहीत. त्यामुळे हा टेम्पो खड्ड्यात पडून पुलाच्या कठड्यावर आदळला. या अपघातात टेम्पोमध्ये बसलेले रमेश किसन चव्हाण (वय अंदाजे 35, रा. पुसद) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी वर्षा रमेश चव्हाण या गंभीर जखमी झाल्या. हे दोघे विदर्भातून मजुरीसाठी नगरला आले होते. अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून पळून गेला.टेम्पोमधील दुधाच्या पिशव्या सुमारे 50 फुटांपर्यंत फेकल्या गेल्या. अपघातानंतर जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, उपसरपंच महेश पवार, विशाल कांबळे यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी धावले. जखमी महिलेस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.