Thu, Apr 25, 2019 17:48होमपेज › Ahamadnagar › शिक्षक संघटनांना सरकार घालेना ‘भीक’!

शिक्षक संघटनांना सरकार घालेना ‘भीक’!

Published On: May 20 2018 1:40AM | Last Updated: May 20 2018 12:12AMनगर : प्रतिनिधी

शालार्थ वेतन प्रणालीच्या तांत्रिक बिघाडामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षकांचे पगार ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. शिक्षक संघटनांचा सरकारवर ‘दबाव’ राहिला नसल्याने सरकारही या संघटनांनी ‘भीक’ घालेनासे झाले आहे. दर महिन्याला शिक्षकांचे पगार काढण्यासाठी मंत्री, मंत्रालयीन सचिवांची भेट घ्यावी लागत असल्याने, यापेक्षा अधिक दुर्दैव ते काय असू शकते? याबाबत शिक्षकांमध्ये चर्चा झडू लागली आहे.

शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअर मध्ये 12 जानेवारीपासून तांत्रिक दोष निर्माण झाला. तेव्हापासून आजतागायत सदरची प्रणाली सुरु झालेली नाही. त्यामुळे तथाकथित शिक्षक संघटनांचे पदाधिकारी दर महिन्याला मंत्रालयाच्या ‘टूर’वर जातात. त्यांचे तथाकथित शिक्षक नेते सर्वांचे नेतृत्व करतात. मंत्रालयात मंत्री, सचिवांची भेट घेऊन ‘ये-रे माझ्या माघल्या...’ प्रमाणे निवेदन देत व्यथा मांडली जाते. त्यानंतर शासनाकडून संबंधित महिन्याचे वेतन ऑफलाईन पद्धतीने करण्याचा आदेश दिला जातो.

हेच तथाकथित शिक्षक नेते मंत्रालयातून जिल्ह्यात येत ‘आमच्यामुळेच पगार झाले’ अशी ‘टिमकी’ मिरवत पुढील महिनाभर फिरतात. बरं या शिक्षक संघटनांचेही पेव फुटलेले. एका संघटनेचे शिष्टमंडळ मंत्रालयात जाऊन आल्याचे कळताच, दुसरी संघटना तत्काळ निवेदन घेऊन मंत्रालयात हजर. त्यांच्यातही चढाओढ लागलेली. संघटनांच्या अध्यक्षांना शिक्षकांमध्ये ‘मसिहा’ म्हणून मिरविण्याची भलतीच हौस.

एकमेकांच्या ‘कुरघोड्यां’त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन लवकरात लवकर ऑनलाईन कसे होईल? हा प्रश्‍न मात्र बाजूलाच राहतो. म्हणजे शिक्षक संघटना मंत्रालयात गेल्या नसत्या तर शिक्षकांचे पगारच झाले नसते, अशी तर यांची भाषा. राज्यभर आमचीच शिक्षक संघटना मोठी, आम्हालाच शिक्षकांचा पाठिंबा अशी ‘वल्गना’ करणार्‍या शिक्षक संघटनांचे खेळ, एकमेकांची जिरवाजिरवी आता सर्वसामान्य शिक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशा संघटनांना किती दिवस भवितव्य राहणार? असा सवाल उपस्थित होत आहे.