Fri, Jul 19, 2019 13:49होमपेज › Ahamadnagar › नेते असलेले ‘गुरुजी भिडले’!

नेते असलेले ‘गुरुजी भिडले’!

Published On: May 30 2018 2:15AM | Last Updated: May 29 2018 11:44PMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यात प्राथमिक शाळेत शिकविणार्‍या गुरुजींचे प्रताप काही केल्या कमी होण्याचे नाव घेईनात. मागील महिन्यात झालेल्या गोळीबार, छडी प्रकरणानंतर आता पुन्हा गुरुजींचे नेते असलेले गुरुजीच एकमेकांविरोधात भिडल्याचा प्रकार घडला. चार्ज देण्यावरून सुरु झालेल्या वादात सुरु असलेली चर्चा ‘मु्द्यांवरून थेट गुद्यांवर’ आल्याने काल (दि. 29) चांगलाच गोंधळ उडाला होता.

तालुका पंचायत समितीच्याजवळ असलेल्या बीएआरसी प्रशिक्षण केंद्रात ही घटना घडली. याबाबत सविस्तर हकीगत अशी की, पूर्वी गुरुकुल मंडळात असलेल्या आणि नुकतेच सदिच्छा मंडळात प्रवेश केलेल्या एका गुरुजींची नुकतीच नगर तालुक्यातील एका प्राथमिक शाळेत बदली झाली. बदली झाली म्हटल्यावर हे गुरु चार्ज घेण्यासाठी निघाले.

दुसर्‍या गुरुजींचीही बदली झालेली. दुसरे गुरुजी हे मुख्याध्यापक संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचे माजी पदाधिकारी. हे दुसरे गुरुही प्रशिक्षण केंद्रात आले. पहिल्या गुरुजींनी दुसर्‍यांकडे चार्ज देण्याची विनंती केली. दुसर्‍या गुरुजींनी पहिल्यांकडे चार्ज दिला. मात्र यावेळी पोषण आहाराचे बिल काढण्यास नकार दिला. यावरूनच दोघात वादाची ठिणगी पडली.

मुद्द्यांवर सुरु असलेला वाद शेवटी गुद्द्यांवर आला. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मारहाण सुरु झाली. या झटापटीत एका गुरुजींचे कपडेही फाटले. जखमीही झाले. आधी बघ्याची भूमिका घेतलेल्यांनी भांडणात पडत प्रकरण तात्पुरते मिटवले. जखमी गुरुजीने जिल्हा रुग्णालयात येत उपचार घेतले. त्यानंतर थेट पोलिस स्टेशन गाठत दुसर्‍या गुरुजीला धडा शिकविण्याचे ठाणले.

पहिले गुरु पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. पाहतो तर दुसरे गुरुही तक्रार देण्यासाठी आधीच ‘डेरेदाखल’ झालेले. दोघेही नेते असल्याने काही शिक्षक नेत्यांनी लागोलाग धाव घेतली. दोघांचीही समजूत काढत प्रकरण न वाढविण्यासाठी मन वळवले. त्यामुळे गुन्हा दाखल झालाच नाही. विशेष म्हणजे हे दोघेही गुरुजी एकमेकांचे नातेवाईकच निघाले. गुरुजींमध्ये घडलेल्या या ‘ढिशूम -ढिशूम’ची गुरुजींच्या वर्तुळात चांगलीच खमंग चर्चा रंगली होती.