Tue, Apr 23, 2019 07:35होमपेज › Ahamadnagar › गोंधळी गुरुजींना शिक्षण समितीचे अभय!

गोंधळी गुरुजींना शिक्षण समितीचे अभय!

Published On: Jun 03 2018 1:11AM | Last Updated: Jun 02 2018 11:50PMनगर : प्रतिनिधी

शिक्षक बँकेत झालेला राडा, शिक्षकाने केलेला गोळीबार, चार्ज देण्यावरून झालेली फ्री स्टाईल मारामारी, जुगार खेळतांना पकडलेल्या शिक्षकांवर कारवाई न केल्याने शिक्षण विभागाची लत्तरे टांगली आहेत. त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा असलेल्या शिक्षण समितीकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने या गोंधळी गुरुजींना शिक्षण समितीचेच अभय असल्याचे दिसून येत आहे. गोंधळी गुरुजींवर कारवाई करण्याबाबत चालढकल करण्यात येत असल्याने काल (दि. 2) शिक्षण समितीच्या सभेत चांगलेच वादंग झाले. शेवटी कारवाई न होताच सभा उरकती घेण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा उपाध्यक्षा राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेस सदस्य राजेश परजने, जालिंदर वाकचौरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले आदींसह सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीलाच सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी शिक्षक बँकेत झालेल्या राड्यानंतर राडेबाज गुरुजींवर, गोळीबार केलेल्या शिक्षकावर, जुगार खेळतांना पोलिसांनी पकडलेल्या शिक्षकांवर कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित केला. प्रत्येक महिन्याला शिक्षक काहीतरी चुकीचा प्रकार करतात. त्यानंतर त्यांना नोटीस बजाविण्यात येते. मात्र कारवाई काहीच होत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी व गोंधळ घालणारे शिक्षक यांच्यात काहीतरी ‘काळेबेरे’ असल्याचा संशय वाकचौरे यांनी व्यक्त केला.

सभेच्या अखेरीस या गोंधळी गुरुजींवर कारवाई करण्याबाबतचा ठराव आचारसंहितेचे कारण सांगत घेता येणार नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. याबाबत जिल्हा निवडणूक विभागाकडे चौकशी केली असता कारवाईला आचारसंहितेची कुठलीही अडचण नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने सभेत सांगितलेले आचारसंहितेचे कारण चुकीचे असल्याचे सिद्ध होत आहे.

जिल्ह्यात अनेक शिक्षक पदवीधर होण्यासाठी प्रवेश घेत आहेत. अनेकांनी घेतलेही आहेत. बहिस्थ अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असल्यास काही अडचण नाही. मात्र ‘रेगुलर’ अभ्यासक्रमाला प्रवेश दाखविणार्‍या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी सदस्य राजेश परजने यांनी केली. रेगुलर पदवी अभ्यासक्रमाला शिक्षकाने प्रवेश घेतल्यास त्याला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी रजा टाकावी लागेल. मात्र अनेक शिक्षक रेगुलर अभ्यासक्रमाला प्रवेश असतांना दुसरीकडे शाळेत शिकवत असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे मागणी परजने यांनी केली. त्यावर अशा शिक्षकांची माहिती एकत्रित करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.