Sun, May 26, 2019 20:45होमपेज › Ahamadnagar › मनपाची कर वसुली पुन्हा ठप्प!

मनपाची कर वसुली पुन्हा ठप्प!

Published On: Jun 04 2018 1:02AM | Last Updated: Jun 03 2018 11:12PMनगर : प्रतिनिधी

मालमत्ता करावरील शास्तीमध्ये दिलेल्या सवलतीमुळे पहिल्या महिन्यात 32 कोटींची वसुली झाल्यानंतर मनपाची कर वसुली पुन्हा एकदा ठप्प झाल्याचे चित्र आहे. 50 टक्के सवलत योजनेसाठी अखेरचे आठ दिवस शिल्लक राहिले असून मनपाची वसुली अद्यापही 35 ते 37 कोटींच्या दरम्यानच रेंगाळली आहे. त्यामुळे सवलत काळात 14 कोटी वसुलीचे प्रभाग अधिकार्‍यांनी घेतलेले ‘टार्गेट’ पूर्ण होण्याची शक्यताही धूसर आहे.

तत्कालीन आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी नगरसेवक व लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर 12 एप्रिलपासून शास्तीमध्ये सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार पहिल्या महिनाभरात (11 मेपर्यंत) शास्तीत 75 टक्के सवलत देण्यात आली होती. या काळात तब्बल 32 कोटींची कर वसुली झाली. यात नियमित करदात्यांनी 14.04 कोटी रुपये जमा केले. तर थकबाकीदारांनी शास्तीमाफीचा फायदा घेत 18.32 कोटी रुपये जमा केले होते. 12 मेपासून शास्तीमध्ये 50 टक्के सवलत दिली जात आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आयुक्‍त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शास्तीमाफी योजनेवर नाराजी व्यक्‍त केली होती.

वसुली विभागाचा आढावा घेत त्यांनी प्रभाग अधिकार्‍यांना वसुलीवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावेळी प्रभाग अधिकार्‍यांनी 50 टक्के सवलत काळात सावेडी 5 कोटी, बुरुडगाव 5 कोटी, शहर 2.50 कोटी, झेंडीगेट 1.50 कोटी असे 14 कोटींच्या वसुलीचे ‘टार्गेट’ घेतले होते. मात्र, सद्यस्थितीत मनपाची कर वसुली 35 ते 37 कोटींच्या दरम्यानच रखडल्याचे सांगितले जात आहे. त्यातच सर्व प्रभाग अधिकारी सध्या ‘मिशन सीना’ मोहिमेत गुंतले असल्याने त्यांचे वसुलीकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, त्यांनी घेतलेले वसुलीचे टार्गेट पूर्ण होण्याची शक्यताही धूसर झाली आहे. दुसरीकडे ‘शास्तीमाफी’साठी नगरसेवक, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींकडे उंबरठे झिजविणार्‍या बड्या थकबाकीदारांनी शास्तीमाफी जाहीर होऊनही या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.