Tue, Jul 16, 2019 01:34होमपेज › Ahamadnagar › तपोवन रस्त्याचा वाद पुन्हा उफाळला!

तपोवन रस्त्याचा वाद पुन्हा उफाळला!

Published On: Mar 14 2018 12:53AM | Last Updated: Mar 13 2018 11:19PMनगर : प्रतिनिधी

उपनगर परिसरातील तपोवन रस्त्याचे काम 14 व्या वित्त आयोगातून मंजूर करण्याच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा शिवसेना व राष्ट्रवादीत वाद उफाळला आहे. मुख्यमंत्री सडक योजनेतूनच हा रस्ता करावा, यासाठी राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. तर वित्त आयोगाच्या निधीतून या कामाला मंजुरी घेण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिगंबर ढवण यांनी महापौरांसह पदाधिकार्‍यांना उपनगरात फिरु देणार नाही, असा इशारा दिल्यानंतर सदरचा निधी वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली. दरम्यान, आयुक्‍तांनी मात्र सदरचा रस्ता ग्रामसडक योजनेतूनच करण्यात येईल व तसेच संबंधित विभागाला कळविले जाईल, असे लेखी आश्‍वासन ‘राष्ट्रवादी’ला दिले आहे.

भिस्तबाग महाल ते तपोवन रस्ता या दीड किमीच्या कामासाठी ढवण यांनी वारंवार आंदोलने केली होती. सावेडी कचरा डेपोकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जात असल्याने घनकचरा व्यवस्थापनसाठी राखीव असलेल्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून हे काम मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली होती. तसा ठरावही महासभेने केला आहे. त्यानंतर या कामासाठी निविदाही मागविण्यात आल्या होत्या. मात्र, दरम्यानच्या काळात आ. संग्राम जगताप यांनी भिस्तबाग महाल ते इंद्रायणी हॉटेल (औरंगाबाद रोड) या तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी मिळावा, असा प्रस्ताव दिला होता. त्याला शासनाकडून मंजुरीही देण्यात आली आहे. 

शासनाकडून निधी उपलब्ध झालेला असतांना वित्त आयोगाच्या निधीचा वापर या कामासाठी करु नये. यातून प्रभाग 1 मधील इतर रस्त्यांची कामे करावीत, अशी मागणी नगरसेवक संपत बारस्कर यांनी केली होती. मात्र, 7 मार्च रोजी प्रशासनाने प्रधानमंत्री सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून त्यांनी मंजूर केलेले काम यापूर्वीच 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर असल्याची माहिती दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने काल आयुक्‍तांच्या दालनात ठिय्या देवून जाब विचारला.

शासनाकडून संपूर्ण रस्त्याच्या कामाला निधी देण्यात आलेला असतांना वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याची गरज काय? मनपाची आर्थिक स्थिती चांगली नसतांना एकाच कामावर निधीसाठी हट्ट का? असा सवाल यावेळी करण्यात आला. त्यानंतर आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी सदरचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतूनच करण्याबाबत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी अभियंत्यांना कळविण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

दुसरीकडे ‘राष्ट्रवादी’ला देण्यात आलेल्या आश्‍वासनाची माहिती मिळाल्यानंतर संतप्त झालेल्या दिगंबर ढवण यांनी आयुक्‍तांसह महापौर व इतर पदाधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. एका कामासाठी किती वेळा संघर्ष करायचा? महासभेत महापौरांनी सत्कार घेतले, पेढेही खाल्ले, तरीही अजून काम मार्गी लागत नसल्याने ढवण यांनी नाराजी व्यक्‍त केली. हे काम मार्गी लागावे, अशी महापौरांचीच इच्छा नाही. या कामासाठी 43 पत्रे दिली आहेत. कामासाठी खूप संघर्ष केला, आता काम जर मंजूर झाले नाही, तर एकाही सत्ताधार्‍याला उपनगरात फिरुन देणार नाही, असा सज्जड इशारा ढवण यांनी दिला. या सत्तेचा सर्वसामान्यांना काही फायदा नाही, असा आरोप करत ढवण यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला. ढवण यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे समजताच महापौरांसह इतर पदाधिकार्‍यांनी पुन्हा त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या कामासाठी निधी वर्ग करण्याचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात आले. त्यामुळे ढवण यांनीही नरमाईची भूमिका घेत सर्वांचे आभार मानले. येत्या दोन दिवसांत थांबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया पुन्हा सुरु होईल, असेही ढवण यांनी सांगितले. दरम्यान, तपोवन रस्त्यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष टोकाला जाण्याची चिन्हे आहेत.