Thu, Jul 18, 2019 16:53होमपेज › Ahamadnagar › पत्नी माघारी बोलल्याने पतीराजाकडून तोडफोड

पत्नी माघारी बोलल्याने पतीराजाकडून तोडफोड

Published On: May 20 2018 1:40AM | Last Updated: May 20 2018 12:10AMश्रीगोंदाः प्रतिनिधी 

राग हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. रागाच्या भरात त्याच्या हातून कुठले कृत्य घडेल याचा नेम नाही. असाच प्रकार तालुक्यात घडला. किरकोळ वादावादीत बायको उलट बोलल्याने पतिराजाचा राग अनावर झाला. पतीने रागाच्या भरात घरातील टीव्ही, कपाट व इतर संसार उपयोगी साहित्याची तोडफोड करून आपल्या रागाला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या पतिराजाची समजूत काढत त्याला शांत केला. या घटनेची मात्र आता चांगलीच चर्चा रंगली आहे. 

संसार म्हटलं की भांडयाला भांड हे लागणारच. नवरा- बायकोत तू- तू , में- मे होणारच.  त्याच झालं असे की,  पती-पत्नीचा किरकोळ विषयावरून वाद सुरू होता. या वादावादीत पत्नी नवर्‍याला माघारी बोलली. मग काय नवर्‍याची चांगलीच सटकली. पतिराजाने मागचा पुढचा विचार न करता दरवाजाच्या बाजूला ठेवलेली काठी हातात घेत घरातील सामान फोडण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्याने घरात जी वस्तू दिसेल तिची नासधूस करण्यास केली. पतिराजाचे अचानक हे रौद्ररुप पाहून पत्नीसह घरातील इतर मंडळी चांगलीच गांगरुन गेली. 

तोडफोडीच्या या आवाजाने शेजारी राहणार्‍या मंडळीनी या पतिराजाला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र पतिराज कुणाचेच काही ऐकन्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. सुमारे अर्धा तास चाललेल्या या गोंधळात कुणीतरी श्रीगोंदा पोलिसांना संपर्क करून माहिती दिली. पोलिस कर्मचारी संदीप पितळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पतिराजाला शांत करण्याचा प्रयत्न करत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात घेऊन आले. 

सहायक पोलिस निरीक्षक नीलेश कांबळे यानी त्या पतिराजाशी संवाद साधून  त्यांना शांत केले. एवढेच नाही तर इतका टोकाचा राग चांगला नाही असे सांगत वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर या पतिराजाने परत अशी चूक करणार नाही असे लेखी देत घरचा रस्ता धरला. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक नीलेश कांबळे म्हणाले, संसारामध्ये वाद होत असतात म्हणून का कुणी अशा पद्धतीने पाऊल उचलणे गैर आहे. वादातून संवाद साधला तर अशा पद्धतीने कुणी पाऊल उचलनार नाही.