Wed, Jun 26, 2019 11:32होमपेज › Ahamadnagar › बारावी परीक्षेच्या आदल्यादिवशी अपघातामध्ये तीन विद्यार्थी ठार

बारावी परीक्षेच्या आदल्यादिवशी अपघातामध्ये तीन विद्यार्थी ठार

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 1:21AMटाकळी ढोकेश्वर : वार्ताहर

बारावी परीक्षेच्या आदल्यादिवशी तीन विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. पारनेर तालुक्यातील नगर-कल्याण भाळवणीनजीक कार-दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी अपघात झाला. दीपक रंगनाथ  गांगुर्डे (रा. माळकूप, ता. पारनेर), सोमनाथ बाळू गांगुर्डे, प्रतिक ठाणगे (दोघे रा. हिवरे कोरडा, ता. पारनेर) हे मयत आहेत. हे तिघेही भाळवणी येथील महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत होते. 

याबाबत माहिती अशी की, भाळवणीपासून तीन किलोमीटर अंतरावरील नगर-कल्याण रस्त्यावरील दहावा मैल परिसरात भरधाव वेगातील कारने (क्र. एम.एच. 03, सीपी 0144) ने मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. 

अपघाताची भीषणता इतकी होती की तीनही विद्यार्थी सुमारे तीस फूट लांब फेकले गेले होते. दुचाकीचे सुटे भाग सुमारे 50 फुटांवर विखुरले गेले होते. या तिघांचे मृतदेह नगर येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारावीची परीक्षा बुधवारी सुरू होत असून, सर्वच विद्यार्थी परीक्षेकडे गांभीर्याने पाहतात. पण, एक दिवस आधी त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.