Fri, Nov 16, 2018 17:26होमपेज › Ahamadnagar › ट्रक-दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार

ट्रक-दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार

Published On: Dec 16 2017 1:38AM | Last Updated: Dec 16 2017 12:50AM

बुकमार्क करा

टाकळी ढोकेश्‍वर : वार्ताहर

 मालट्रक व मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील घोडके वस्तीनजीक हा अपघात झाला. अपघातानंतर चालक ट्रक घेऊन फरार झाला. सावळेराम भिकाजी भनगडे व परिघा सावळेराम भनगडे असे या अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. अपघाताबाबत सविस्तर माहिती अशी की, ढवळपुरी येथील भनगडे दाम्पत्य भाळवणीहून ढवळपुरीकडे काल (दि. 15) सकाळी 11 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (क्र. एमएच17 सीवाय 9131) वरून जात होते. त्यावेळी समोरून खत घेऊन आलेल्या मालट्रकने (क्र. एमएच12 एक्यू 1087) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले. या घटनेची 

माहिती ढवळपुरीचे सरपंच डॉ. राजेश भनगडे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात कळविली. ही माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल आण्णासाहेब चव्हाण व कॉन्स्टेबल पवार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारनेर येथे पाठविण्यात आले. घटना घडल्यानंतर मालट्रक घेऊन चालक फरार झाला. देवानंद सावळेराम भनगडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रकचालक सुरेश बबन औटी (रा. बोरी ता. जुन्नर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल आण्णासाहेब चव्हाण व कॉन्स्टेबल पवार हे करीत आहेत. दरम्यान, या अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे ढवळपुरी येथील आठवडे बाजार व बाजारपेठ दुपारी 4 वाजता बंद करून सार्वजनिक दुखवटा पाळण्यात आला.