Tue, Feb 19, 2019 08:14होमपेज › Ahamadnagar › अतिक्रमणाद्वारे दोन एकर जमीन लाटली!

अतिक्रमणाद्वारे दोन एकर जमीन लाटली!

Published On: Jul 31 2018 1:28AM | Last Updated: Jul 31 2018 12:32AMपारनेर ः प्रतिनिधी   

आदर्शग्राम म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील वडगाव आमली येथील शेतकर्‍याने शासकीय रस्त्यावर अतिक्रमण करून तब्बल 2 एकर जमीन लाटण्याचा पराक्रम करून गावाच्या लावलौकीकास धक्‍का पोहचविला आहे! महसूल प्रशासनाने रस्त्यावरील हे अतिक्रमण न हटविल्यास नगर-कल्याण महामार्गावर 16 ऑगस्ट रोजी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. 

यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, ग्रामपंचायत हद्दीतील 60 पेक्षा जास्त कुटुंबे शेतीच्या सोयीसाठी बोरुडेमळा येथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. बोरुडेमळा येथे जाण्यासाठी गट क्रमांक 277/1, 9 व 10 मधून 33 फुटांचा शासकीय रस्ता आहे. या रस्त्यावर एकाने अतिक्रमण करून रस्ता पूर्ण बंद केला आहे. या जमिनीचे मालक दत्तात्रय किसन पवार यांचे वडील किसन गोविंदराव पवार यांनी हे 9 एकर 10 गुंठे क्षेत्र भालचंद्र मोरे यांच्याकडून खरेदीखताने विकत घेतलेले आहे. खरेदीखत झालेले असल्याने हे क्षेत्र वाढण्याची सुताराम शक्यता नाही. तरीही दत्तात्रय पवार यांनी परस्पर नवा नकाशा तयार करून त्यात हे क्षेत्र 11 एकरांपेक्षाही जास्त असल्याचे भासविले आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी पवार यांनी संपूर्ण शासकीय रस्त्यावर अतिक्रमण केले असून, त्यामुळे ग्रामस्थांची चांगलीच गैरसोय होत आहे.

तहसीलदारांनी पवार यांनी तयार केलेला नकाशा रद्द करून सन 1956 च्या खरेदीखताप्रमाणे 9 एकर 10 गुंठे व 6 गुंठे पोटखराबा हे क्षेत्र मोजून काढल्यास सर्व रस्ते मोकळे होतील, असे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. बोरुडे मळ्यात 300 पेक्षा जास्त ग्रामस्थ वास्तव्यास आहेत. शाळेसाठी जाणारे विद्यार्थी तसेच शेतीमालाची वाहतूक करणार्‍या शेतकर्‍यांना रस्ता नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही अतिक्रमणे काढण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. मात्र न्याय न मिळाल्याने येत्या 16 ऑगस्ट रोजी नगर-कल्याण महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.