Mon, Jun 24, 2019 17:35होमपेज › Ahamadnagar › जिल्हाधिकार्‍यांकडेच आयुक्‍तांचा पदभार ठेवा!

जिल्हाधिकार्‍यांकडेच आयुक्‍तांचा पदभार ठेवा!

Published On: May 19 2018 1:29AM | Last Updated: May 18 2018 11:47PMनगर : प्रतिनिधी

आयुक्‍तपदाचा प्रभारी कार्यभार हाती घेतल्यानंतर, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिकेच्या कारभाराला चांगली शिस्त लावली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी किमान वर्षभर त्यांच्याकडेच आयुक्‍तपदाचा कार्यभार ठेवावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती संजय गाडे व माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. महापालिकेचे आयुक्‍त घनश्याम मंगळे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर मधुकरराजे अर्दड यांची नियुक्‍ती करण्यात आली. मात्र, ते अद्याप महापालिकेत हजर झालेले नाहीत. त्यामुळे मंगळे यांना बदलीच्या ठिकाणी तातडीने हजर होण्याचे आदेश देताना, शासनाने आयुक्‍तपदाचा अतिरिक्‍त कार्यभार जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे सोपविलेली आहे. आयुक्‍त, दोन्ही उपायुक्‍त, कॅफो, सहाय्यक आयुक्‍त, शहर अभियंता अशा सर्व महत्त्वाच्या पदांवर महापालिकेत सध्या ‘प्रभारी राज्य’ सुरू आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आयुक्‍तपदाचा अतिरिक्‍त कार्यभार हाती घेताच, कठोर निर्णय घेत महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी मुख्य प्रशासकीय इमारतीत गैरहजर असलेल्या कर्मचार्‍यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला. त्याबरोबरच बैठका घेत महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. शास्तीमाफीचा दुसरा टप्पा सुरू असलातरी, मालमत्ता कराची थकबाकी न भरणारांवर जप्ती कारवाया करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मनपाची बिघडलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे. 

गेल्या दोन तीन वर्षांपासून मनपाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. मालमत्ता कराची वसुली होत नसल्याने, विकासकामे ठप्प झालेली आहेत. शासकीय योजनांची कामेही रखडलेली आहेत. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी वसुली विभागाला थकबाकीबाबत जप्ती कारवाईचे आदेश देतानाच, शासकीय योजनाचा आढावा, बोगस कामांना आळा, शासकीय देणी देणे, आदी बाबींवर लक्ष केंद्रीत केले आहे. ठप्प झालेले कचरा संकलन, सीना नदीतील अतिक्रमणे याबाबत स्वत: पाहणी करून निर्णय घेतले आहेत. 

त्यामुळे महापालिकेच्या कारभाराला शिस्त लागून, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी तसेच रखडलेल्या विकासयोजनांना गती मिळण्यासाठी महापालिकेत अशाच आयुक्‍तांची गरज आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडेच किमान वर्षभर महापालिकेच्या आयुक्‍तपदाचा कार्यभार ठेवण्यात यावा, अशी मागणी गाडे व पवार यांनी केली आहे.