Mon, Jun 17, 2019 15:17होमपेज › Ahamadnagar › हल्लेखोरांवर मोक्कांतर्गत कारवाई करा!

हल्लेखोरांवर मोक्कांतर्गत कारवाई करा!

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 12:34AMनगर : प्रतिनिधी

नगरमध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे दहशत निर्माण करत आहेत. पोटनिवडणुकीतही त्यांनी अशाच पध्दतीने शिवसेनेला शह दिला. शिवसेनेच्या दोन पदाधिकार्‍यांची निघृण हत्या करण्यात आली. त्याच्या चौकशीसाठी आमदार संग्राम जगताप यांना आणल्यानंतर 200 ते 250 जणांच्या जमावाने पोलिस अधिक्षक कार्यालयावर हल्ला केला. त्यामुळे ‘हे युपी आहे की महाराष्ट्र?’ असा सवाल करत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी व हे दोन्ही प्रकार संघटीतपणे करण्यात आल्याने गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेस परिवहन मंत्री दिवाकर रावते, खा. सदाशिव लोखंडे, उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम आदी उपस्थित होते. ना. कदम म्हणाले की, घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या भेट घेणार आहोत. तपासात व गुन्ह्यात कुठल्याही त्रूटी राहू नयेत, याबाबत पोलिस अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात कायदा- सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे.

सहाय्यक पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे व पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्या संगनमतानेच गुन्हेगारी वाढत चालली असून, त्यांना तात्काळ निलंबित करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या संगनमतानेच राष्ट्रवादी काँग्रेसची दहशत सुरु आहे. केडगाव पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या बूथवर येवून त्यांनी शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना शिविगाळ केली होती. पोलिसांशी संगनमत असल्याने हिम्मत वाढत गेली.

आमच्या दोन्ही कार्यकर्त्यांची झालेली हत्या ही पक्षाने गांभिर्याने घेतली आहे. त्यामुळे ज्यांनी खून केलाय त्यांना फाशीच व्हायला हवी. शहरात अशीच परिस्थिती कायम राहिली तर शिवसेना आपल्या पध्दतीने उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला. एकीकडे राज्यात शिवसेनेशी युती करायची असं बोलायचं आणि दुसरीकडे पाठीवर वार करायचे अशी भुमिका भाजपची आहे.

कर्डीले, जगताप आणि कोतकर नातेवाईक असल्यानेच केडगावात शिवसेनेच्या विरोधात तीन पक्ष लढले.पोलीस अधिक्षक कार्यालयात आरोपीला चौकशीसाठी आणल्यानंतर मोठा जमाव तेथे येतो, आरोपी असलेल्या आमदाराला खांद्यावर बसवून घेऊन जातो असा प्रकार तर उत्तरप्रदेश, बिहारमध्येही होत नाही. राज्यात पहिल्यांदाच अशी घटना घडली. हा खून दडपण्याच काम सुरु आहे मात्र शिवसेना असे होऊ देणार नाही. हत्या करणारा आरोपी हत्येपूर्वी केडगावातील विजयी उमेदवाराचा फोटो घेऊन नाचत होता. त्यामुळे या प्रकारामागे कोण आहे? हे स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, मृत शिवसैनिकांच्या परिवाराची जबाबदारी पक्षाने घेतली आहे. शिवसेना सत्तेत किती सहभागी आहे हे सर्वांनाच माहिती आहे. सरकारला आमचा फक्त टेकू आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी असा पुर्नउच्चार त्यांनी केला. ‘समझने वालोंको इशारा काफी है’, असे म्हणत पक्ष पातळीवर पक्ष प्रमुख निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.