Mon, Nov 19, 2018 06:41होमपेज › Ahamadnagar › मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या

Published On: Jul 28 2018 1:31AM | Last Updated: Jul 27 2018 10:06PMनगर : प्रतिनिधी

आरक्षणाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्यावतीने नगर बंद तसेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन अत्यंत शांत आणि संयमाने करण्यात आले. तसेच या आंदोलनाची प्रशासनाला पूर्व कल्पना देण्यात आली होती. परंतु प्रशासनाने काही तरूणांवर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी सकल मराठा समाजातर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, आरक्षणासाठी नगर बंदच्या काळात शहरात काही ठिकाणी किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडले. अशी दगडफेक करून काहींनी आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. सकल मराठा समाज अशा लोकांना पाठिशी घालत नाही. परंतु आंदोलनाच्या आडून निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. जिल्ह्यात होत असलेल्या आंदोलनात समाज बांधव मोठ्या प्रमाणावर प्रशासनाला सहकार्य करण्याची भुमिका घेत आहे जेणेकरून काही अघटीत घडू नये. तरी असे असून सुध्दा गुन्हे दाखल होत आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या उद्देशाने समाजातील सर्व थरातील घटकांनी प्रत्यक्षरित्या सहभाग नोंदविला व शांततेच्या मार्गाने आंदोलने ठिकठिकाणी केले. समाजाच्यावतीने 2 वर्षापासून शांततेच्या मार्गानेच आरक्षणासाठी मराठा समाज झटत आहे. राज्यात 56 मुकमोर्चे काढण्यात आले यामध्ये कुठल्याही प्रकारची घटना घडली नाही. काही समाज कंटकाकडून समाजाला बदनाम करण्यासाठी दगडफेक, गाड्या फोडाफोडी करत असतील तर आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही.

जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. परंतु याच्या आडून पोलिसांनी काही निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल केले आहे. हे गुन्हे मागे न घेतल्यास जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. याला सर्वस्वी जबाबदार पोलिस प्रशासन राहील. याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली.