Mon, May 27, 2019 07:35होमपेज › Ahamadnagar › पीक विम्याचा लाभ घ्या : पालकमंत्री शिंदे

पीक विम्याचा लाभ घ्या : पालकमंत्री शिंदे

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 03 2018 12:16AMनगर ः प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने विविध योजना राबविल्या जात आहेत. लहरी हवामानामुळे पीक धोक्यात येतात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम 2018च्या प्रचार व प्रसिद्धी रथाचे उद्घाटन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रा. शिंदे बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्‍हाटे, कृषी उपसंचालक विलास नलगे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सी.डी.बंबाळे, संग्राम भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

प्रा. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पीकविमा योजना अशा परिस्थितीत फायद्याची ठरते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी पिकांचा विमा उतरवून घ्यावा.

कृषी अधीक्षक लोणारे यांनी पीक विमा योजनेची माहिती दिली. बँक व सी.एस.सी.केंद्रात विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत दि.24 जुलैपर्यंत आहे. भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफुल, कारळे, कापूस, खरीप कांदा या पिकांचा समावेश आहे.