Tue, Jul 23, 2019 17:00होमपेज › Ahamadnagar › वैद्यकीय अधिकार्‍यावर कारवाई करा

वैद्यकीय अधिकार्‍यावर कारवाई करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

संगमनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील कनोली येथील तीन महिलांचा मृत्यू डेंग्यूने नव्हे, तर अन्य व्यक्तिगत आजाराने झाल्याचे सांगणार्‍या तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसत त्यांची तात्काळ चौकशी करुन कारवाई न केल्यास पंचायत समितीसमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करू, असा इशारा दिला. 

याबाबत कनोली ग्रामस्थांनी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, एका महिन्यात गाव परिसरातील जवळपास 25 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यातच चहाबाई शिवाजी वर्पे,  सुमन जगन्नाथ वर्पे व तब्बसूम बिलाल शेख या तीन महिलांचा उपचार सुरू असताना डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांच्या पथकाने कनोली गावात जंतनाशक औषधाची फवारणीही केली होती.

त्यावेळी त्यांनी गोबर गॅसच्या टाक्यांमध्ये डेंग्यूचे डासही आढळल्याचे सांगितले होते. मात्र, तब्बसूम शेख यांच्या मृत्यूनंतर डॉ. घोलप यांनी कनोली गावातील तीन महिलांचे मृत्यू डेंग्यूमुळे नव्हे, तर इतर आजारांमुळे झाल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली. यामुळे कनोलीच्या ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हा डेंग्यू मृत्यू कमिटी व नाशिक येथील विभागीय कमिटी यांची बैठकीत चर्चा होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे डॉ.घोलप यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेली माहिती वरिष्ठांच्या परवानगीने दिली होती का? त्यांनी नेमके कोणते निकष गृहीत धरले? या गोष्टी संशयास्पद असल्याने डॉ.घोलप यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. निवेदनावर सुरेश थोरात, शिवाजी जगताप, लहानू वर्पे, बंडू वर्पे, प्रकाश वर्पे, किसन हारदे, स्वप्निल वाबळे, निसार शेख, सुलतान शेख, अमजद शेख यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.