होमपेज › Ahamadnagar › केडगावच्या ‘त्या’ चार कर्मचार्‍यांवर कारवाई!

केडगावच्या ‘त्या’ चार कर्मचार्‍यांवर कारवाई!

Published On: May 31 2018 1:33AM | Last Updated: May 30 2018 10:40PMनगर : प्रतिनिधी

महापालिकेच्या केडगाव उपकार्यालयात तसेच परिसरात विविध विभागांच्या कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काल (दि.30) आढावा घेतला. केडगाव हत्याकांडात आरोपी असलेले चार कर्मचारी एप्रिल महिन्यापासून गैरहजर आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही यावेळी बजावण्यात आले.

केडगाव कार्यालयासह परिसरात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची काल जिल्हाधिकार्‍यांनी झाडाझडती घेतली. यात एकूण 156 पैकी 132 कर्मचारी उपस्थित होते. आरोग्या विभागाकडील 81 पैकी 64 कर्मचारी उपस्थित होते. तर पाणीपुरवठा विभागाचे 25 कर्मचारी हजर होते. कार्यालयातील 23 पैकी 2 कर्मचारी गैरहजर होते. कर्मचार्‍यांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी चांगले काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात येईल, मात्र कामचुकारांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. हत्याकांडात आरोपी असलेले शरद लगड (वसुली), रमेश कोतकर (मंगल कार्यालय), विजय कराळे व अशोक कराळे (पाणीपुरवठा) हे चार कर्मचारी एप्रिल महिन्यापसून कामावर गैरहजर आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आस्थापना विभाग प्रमुखांना दिले आहेत. दरम्यान, केडगाव परिसरातील अस्वच्छतेच्या मुद्द्यावरुन आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना द्विवेदी यांनी धारेवर धरले. कर्मचार्‍यांनी गणवेश वापरणे बंधनकारक आहे. तुम्हाला वेतन हवे की खैरात हवी? असा सवाल करत चांगले काम करा, असा सल्ला द्विवेदी यांनी यावेळी दिला.

अधिकारी, पदाधिकार्‍यांकडील कर्मचारी काढून घ्या!

महापालिकेत अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे अधिकारी व पदाधिकार्‍यांकडे काम करतात. याचे प्रमाण मोठे आहे. महापौर वगळता उर्वरीत सर्व पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या निवासस्थानी कार्यरत असलेले कर्मचारी तात्काळ काढून घ्यावेत, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आयुक्‍तांच्या निवासस्थानी व जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेलेस कर्मचारीही काढून घ्यावेत, असे द्विवेदी यांनी सांगितले.

‘उद्यान’कडील कर्मचारी संख्येत कपात!

उद्यान विभागाकडे 68 कर्मचारी आहेत. सुरु असलेल्या उद्यानांच्या प्रमाणात ही संख्या मोठी असल्याने 20 कर्मचार्‍यांची कपात करुन ते इतरत्र वर्ग करावेत, असे आदेशही जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आढावा बैठकीत दिले आहेत. मंगल कार्यालये, तालीम, व्यायाम शाळा आदी खासगी तत्वावर चालविण्यास द्यावेत. तेथील सर्व कर्मचारी काढून घ्यावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.