Thu, Apr 25, 2019 13:26होमपेज › Ahamadnagar › पर्यटनस्थळांवरील धोक्याच्या ठिकाणी लागणार बोधचिन्ह!

पर्यटनस्थळांवरील धोक्याच्या ठिकाणी लागणार बोधचिन्ह!

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 11:50PMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील पर्यटन आणि प्रेक्षणीय स्थळांवर काही धोक्याची ठिकाणे आहेत. या ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना अनावर होतो. सेल्फी काढण्याच्या धुंदीत जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे  अशा सेल्फी पॉइंट ठिकाणी धोक्याचे  बोधचिन्ह आणि सूचना फलक तात्काळ लावावेत असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी सर्व शासकीय विभागांच्या अधिकार्‍यांना दिले आहेत. 

पर्यटन ठिकाणी सेल्फी काढण्याचा उत्साह दिवसागणिक वाढू लागला आहे.  सेल्फी काढण्याच्या धुंदीत राज्यभरातील काही पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. पर्यटकांचा जीव वाचविण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षतेसाठी  पर्यटनस्थळी व प्रक्षेणीय स्थळांच्या धोक्याच्या ठिकाणी सेल्फी पॉइंट वर धोक्याची  बोधचिन्ह आणि सूचना फलक लावण्यात यावत, असे निर्देश राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी जिल्ह्यातील विविध विभागांना याबाबत आदेश दिले आहेत. 

जिल्ह्यात कळसुबाईचे शिखर,  हरिश्चंद्रगड व रतनगड याबरोबरच अकोले तालुक्यातील प्रवरा, आढळा व  मुळा नद्यांचे उगमस्थान , भंडारदरा धरणावरील रंधा धबधबा, मुळा धरणावरील पर्यटन स्थळ,  मोहटादेवी , तसेच प्रवरा संगम आदी सारखी विविध  निसर्गरमणीय तसेच धार्मिक पर्यटन स्थळे मोठ्या प्रमाणावर आहेत.  या पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी जिल्ह्यात वर्षभर पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. अशा ठिकाणी स्वतःचे छायाचित्र मोबाईलव्दारे कॅच करण्याचा कल मोठया प्रमाणात वाढला आहे. अशा वेळी अनावधानाने तोल गमावून जीव गमावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा  ठिकाणी निषिद्ध क्षेत्र वा धोक्याचे ठिकाण अशा प्रकारचा सूचनाफलक लावण्यात यावा तसेच आवश्यकतेनुसार सुरक्षा कठडे लावण्याचे निर्देश पाटबंधारे, वन, बांधकाम, महापालिका, जिल्हा परिषद यांच्यासह संबंधित विविध विभागांच्या प्रमुखांना  सूचना देण्यात आल्या आहेत. 

धोक्याच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात यावी. कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तीय हानी होणार नाही,  याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करून त्याबाबतचा अहवाल तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करावा, असे निर्देश देखील त्यांनी धिले आहेत.