Sun, Jun 16, 2019 02:10होमपेज › Ahamadnagar › पारनेरमधील स्वामी समर्थ मंदिरात चोरी

पारनेरमधील स्वामी समर्थ मंदिरात चोरी

Published On: Aug 03 2018 1:33AM | Last Updated: Aug 02 2018 11:32PMपारनेर : प्रतिनिधी 

शहरातील स्वामी समर्थ केंद्रात अज्ञात चोरटयाने घुसून स्वामी समर्थांची चांदीची मूर्ती व सोन्याचा मुकूट   चोरून नेला. बुधवारी रात्री 10 ते मध्यरात्री 12 च्या दरम्यान ही चोरी झाली. यासंदर्भात पारनेर पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला असून, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र पवार पुढील तपास करत आहेत. 

केंद्रातील सीसीटीव्हीमध्ये हा चोरटा कैद झाला आहे. अपुरा प्रकाश तसेच मखमलने तोंड बांधलेले असल्याने त्याची ओळख पटविताना अडचणी येत आहेत. केंद्रात घुसलेल्या चोरास बाहेरून आणखी दोन ते तिघांनी मदत केली असल्याची शक्यता आहे. रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान चोरटयांनी गाभार्‍यातील खिडकीचे गज तोडण्याचा प्रयत्न केला, तो अशस्वी झाल्यानंतर मंदिराच्या मागील बाजून असलेल्या षटकोनी खिडकीची जाळी तोडून प्लॅस्टिक बॅरलवर चढून लोखंडी पाईच्या मदतीने रात्री 10 वाजून 7 मिनिटांनी एक चोरटा षटकोनी खिडकीतून खाली उतरला.

मंदिरातील दिवा  बंद करून सर्वप्रथम दानपेटी फोडण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु दणकट कुलूप असल्याने त्याचा प्रयत्न अशस्वी झाला. मंदिरात उचकापाचक करताना तो अनेकदा गाभार्‍यातील खिडकीजवळ जाऊन कोणाशीतरी बोलत असल्याचे तसेच वेळोवेळी बंद केलेला दिवा पुन्हा सुरू करून अंदाज घेऊन पुन्हा बंद करीत होता. सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये ते दिसत आहे. रात्री 11 वाजून 42 मिनिटांनी मंदिरात सीसीटीव्ही असल्याचे चोरट्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने कॅमेर्‍यावर झाकण टाकले. त्यानंतर मात्र चोरट्याच्या हालचाली कॅमेर्‍यात कैद झाल्या नाहीत. 

मंदिरातील स्वामी समर्थांची चांदीची मूर्ती, सोन्याचा मुकूट घेऊन चोरटा रात्री 12 च्या सुमारास  इतर साथीदारांसह तेथून पसार झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पारनेर पोलिस ठाण्यापासून हकेच्या अंतरावर हे मंदिर असून पोलिसांच्या लक्षात हालचाली येऊ नये म्हणून चोरट्यांनी मंदीराच्या मागील बाजूकडून प्रवेश केला.