Tue, Jul 16, 2019 21:49होमपेज › Ahamadnagar › भुजबळांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा उपनिरीक्षक निलंबित 

भुजबळांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा उपनिरीक्षक निलंबित 

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 19 2018 1:36AMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत वादग्रस्त वक्‍तव्य केल्याप्रकरणी श्रीगोद्याचे पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. नागपूर येथे विधानसभा अधिवेशनात काल (दि.18) याबाबत विशेष हक्‍कभंग प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला.

श्रीगोदा तालुक्यातील कोसेगव्हाण येथे आरोपींना पकडण्यासाठी गेले असता, पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी छगन भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. या प्रकरणाचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. 

राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड व आ. राहुल जगताप यांनी या संदर्भात तारांकित प्रश्‍न उपस्थित करीत हक्‍कभंग प्रस्ताव मांडला. त्यास शिवसेना व काँगे्रसनेही पाठिंबा दिला. राष्ट्रवादीच्या आमदारांनी उपनिरीक्षक जाधव यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी केली. त्यानंतर विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी जाधव यांना निलंबित करण्याची घोषणा केली. यासंदर्भात बोलताना आ. राहुल जगताप म्हणाले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भुजबळ यांच्याबद्दल कारण नसताना उपनिरीक्षक जाधव यांनी अपशब्द काढले होते. कोसेगव्हाण येथे माजी सरपंच भीमराव नलगे यांच्या वस्तीवर काही संशयित आरोपींना पकडण्यासाठी गेले असता, जाधव यांनी हे अपशब्द वापरले. ही क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या, त्याविरोधात आंदोलने झाली, तरी निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही.

त्यामुळे याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या आमदारांचा आक्रमकपणा पाहून विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांनी काल जाधव यांना निलंबित करण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बाके वाजवून समाधान व्यक्त केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अधिकारी जर अशा पद्धतीने बेजबाबदारपणे बोलत असतील आणि त्यांच्यावर कारवाई होत नसेल, तर अशा अधिकार्‍यांचे धाडस वाढेल. आपली जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव होण्यासाठी त्यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर सभापती बागडे यांनी जाधव यांच्या निलंबनाची घोषणा केली.

चुकीचे वागणार्‍यांवर कारवाईची भूमिका : आ. जगताप 

आ. राहुल जगताप म्हणाले, अधिकारी जर अशा पद्धतीने बोलून हुकूमशाही गाजविण्याचा प्रयत्न करत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही. कुणी चुकीच्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर थेट कारवाई करण्याची आपली भूमिका असणार आहे.