कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथील रोहन दत्तात्रय जंजीरे या विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबणार्या चंद्रकात सोपान शिंदे या शिक्षकास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विश्वजित माने यांनी निलंबित केले आहे. त्याची पारनेर येथे मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
गणित चुकल्याने रोहन या दुसरीतील विद्यार्थ्यांच्या तोंडात शिक्षक शिंदे याने लाकडी छडी कोंबली होती. त्यामुळे रोहनच्या अन्ननलिकेस व श्वासनलिकेस गंभीर इजा झाली. जखमी रोहनवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहनची आई सुनीता दत्तात्रय जंजीरे यांनी पोलिस ठाण्यात शिक्षक शिंदे याच्या विरोधात फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर पिंपळवाडीतील ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले होते. गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी शाळेस भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. तसेच तसा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कारर्यकारी अधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकार्यांना पाठवून दिला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी आधिकारी माने यांनी शिक्षक शिंदे यास निलंबीत केले आहे.
शिंदे यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम 1967 चे कलम 3 चा भंग केला आहे. त्यानुसार शिस्तभंग कारवाई करण्यात येत आहे. जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात येत आहे. तोपर्यंत शिंदे पारनेर येथे मुख्यालयात राहणार आहेत. पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रोहनवर डॉक्टर उपचार करीत आहे.
Tags : Suspended ,'teacher, that,nagar news