Tue, May 21, 2019 22:22होमपेज › Ahamadnagar › रस्ताप्रकरणी पं. स. शाखा अभियंता निलंबित 

रस्ताप्रकरणी पं. स. शाखा अभियंता निलंबित 

Published On: Jul 05 2018 1:36AM | Last Updated: Jul 05 2018 12:47AMटाकळी ढोकेश्वर : वार्ताहर

पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील बोरवाकवस्तीकडे जाणार्‍या सिमेंट रस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता. मात्र ठेकेदाराने अधिकार्‍यांना हाताशी धरून रस्त्याचे फक्त मुरमीकरण केल्याची धक्कादायक माहिती जि. प.च्या चौकशी अहवालात समोर आली आहे. त्यामुळे या कामात दोषी असणारे पंचायत समितीचे शाखा अभियंता बी. डी. काकडे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांनी निलंबित केले आहे. तसेच पारनेर पं. स.च्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जे. एम. कडाळे यांची श्रीगोंद्यात बदली केली आहे. कडाळे यांचा कार्यभार शाखा अभियंता आर. एल. नागपुरे यांच्या कडे देण्यात आला आहे. 

बोरवाक येथील बोगस रस्ताप्रकरणी जे. एम. कडाळे व बी. डी. काकडे यांना निलंबित करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांच्याकडे केली होती. तसेच ठेकेदारावर  कारवाई  करून त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही दाते यांनी  केली होती. 

खडकवाडी येथील बोरवाक रस्तावर मार्च 2018 अखेर कोणत्याही प्रकारचा खर्च न करता 5 लाख 90 हजार 337 रुपये बोगस खर्च दाखविण्यात आला आहे. त्यामुळे या बोगस रस्ताकामाची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य दाते यांच्यासह ग्रामस्थांनी तीन आठवड्यापूर्वी जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण केले होते. यासबंधीची जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.

त्यानंतर जिल्हा परिषदेने चौकशी समिती नेमल्यानंतर चौकशी अहवालात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. या चौकशी अहवालामध्ये रस्त्याचे काम हे मूळ अंदाजपत्रकाप्रमाणे झालेले नाही. या कामासंदर्भात निविदा प्रक्रिया  सदोष राबविण्यात आली असून, कंत्राटदारास दिलेला कार्यारंभ आदेश नियमबाह्य आहे. काम करताना सार्वजनिक बांधकाम  विभागाकडून बदलासंदर्भात  वेळोवेळी परवानगी घेणे आवश्यक असताना तसे झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी काय, कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. 

दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभागाच्या वतीने 20 मार्च 2018 रोजी खडकवाडीतील बोरवाकवस्तीकडे जाणार्‍या रस्त्याच्या मुरूमीकरणासाठी 5 लाख 90 हजार 339 रुपये मंजूर करण्यात आले होते. सदर रस्त्याच्या कामाची चौकशी व पाहणी  केली असता, कोणत्याही प्रकारचे काम न करता फक्त 1135 मीटर लांबीचा मुरूम पसरविण्यात आला आहे. त्यामुळे  या कामात काहीतरी काळेबेरे असण्याची शक्यता जि. प. सदस्य काशिनाथ दाते यांनी व्यक्त  केली होती. त्यानुसार अनेक गंभीर बाबी आढळून आल्याने या दोन्ही वरिष्ठ अधिकारांवर मुख्य कार्यकारी अधिकारांनी कारवाई केली आहे.