Wed, May 22, 2019 10:37होमपेज › Ahamadnagar › प्रभारी उपायुक्‍त दराडे निलंबित!

प्रभारी उपायुक्‍त दराडे निलंबित!

Published On: Feb 24 2018 1:40AM | Last Updated: Feb 24 2018 1:35AMनगर : प्रतिनिधी

बहुचर्चित पथदिवे घोटाळाप्रकरणी नगरविकास विकास विभागाने कठोर पावले उचलत, महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. चौकशी अहवालात ठपका असलेल्या सहाय्यक आयुक्‍त तथा प्रभारी उपायुक्‍त विक्रम दराडे यांना निलंबित करुन, त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश सहसचिव एस. एस. गोखले यांनी बजावले आहेत. दरम्यान, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच वरिष्ठ अधिकार्‍यावर कारवाई झाल्यामुळे अधिकारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या 29 डिसेंबरला झालेल्या सभेत विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी पथदिवे घोटाळा उघडकीस आणल्यानंतर आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यात ठेकेदार, दोन्ही उपायुक्‍तांसह, मुख्य लेखाधिकारी व मनपाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर ठपके ठेवण्यात आले. मनपाची आर्थिक फसवणूक व गंभीर अनियमितता झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आल्यानंतर सदरचा अहवाल आयुक्‍तांनी नगरविकास विभागाकडे सादर केला होता. 7 फेब्रुवारीला ठेकेदार सचिन लोटकेसह अभियंता रोहिदास सातपुते, बाळासाहेब सावळे, लिपिक भरत काळे यांची चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले होते. त्यानंतर काल उपायुक्‍त दराडे यांच्या निलंबनाचे आदेश शासनाने दिले आहेत.

लोटके, सातपुते, सावळे व काळेवर यापूर्वीच गुन्हा दाखल झालेला असून, काळेला अटक करण्यात आलेली आहे. तर सातपुते व सावळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज काल न्यायालयाने फेटाळला आहे. 

दराडे यांनी घोटाळ्यातील 19 पैकी 9 देयकांना अंतिम मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे पोलिसांच्या चौकशी अहवालातही त्यांच्यावर ठपका आहे. दराडे यांच्यासह उपायुक्‍त राजेंद्र चव्हाण यांच्यावरही गुन्हा दाखल करणार असल्याचे तपासी अधिकार्‍यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. काल शासनाकडून दराडे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्यामुळे पोलिसांकडूनही दराडे यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे.

दरम्यान, महापालिकेत वरिष्ठ अधिकार्‍यावर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने अधिकारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुसरे उपायुक्‍त चव्हाण यांच्यावरही शासनाकडून कारवाई होणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.