Tue, Apr 23, 2019 20:26होमपेज › Ahamadnagar › बनावट ऐपत प्रमाणपत्र सादर करून जामीन

बनावट ऐपत प्रमाणपत्र सादर करून जामीन

Published On: May 17 2018 1:37AM | Last Updated: May 16 2018 11:55PMनगर : प्रतिनिधी

बनावट ऐपत प्रमाणपत्रावर जामीन घेऊन फरार होणार्‍या आरोपीसह जामीनदाराविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयातील सहाय्यक अधीक्षकांनी कँप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राजेंद्र वामनराव जगताप (रा. आदर्शनगर, सेंट्रल कॉर्नर मागे, येरवडा, पुणे), गौतम अण्णासाहेब वर्पे (रा. वरवंडी, ता. संगमनेर) यांचा समावेश आहे. याबाबत न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक चंद्रकांत देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी वर्पे यास न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या ऐपत प्रमाणपत्रावर जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला होता. आरोपीच्यावतीने राजेंद्र जगताप याने रेशनकार्ड, रेशनिंग कार्ड व ऐपत दाखला सादर करून जामीन करून घेतला होता. ऐपत प्रमाणपत्रावर पुणे तहसीलदारांच्या बनावट सह्या व शिक्के होते. खोटी कागदपत्रे सादर करून जगताप याने वर्पे याचा जामीन करून घेतला होता. जामिनावर सोडल्यानंतर गौतम वर्पे हा फरार झाला आहे. याप्रकरणी कँप पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 420, 465, 467, 472 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहेत.