होमपेज › Ahamadnagar › नगर पोलिसांनी मध्यप्रदेशात राबविले सर्जिकल स्ट्राईक!

नगर पोलिसांनी मध्यप्रदेशात राबविले सर्जिकल स्ट्राईक!

Published On: Feb 24 2018 1:40AM | Last Updated: Feb 24 2018 1:33AMनगर : प्रतिनिधी

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने मध्यप्रदेशात जाऊन सर्जिकल स्ट्राईक केले. लहान मुलांचा वापर करून लग्न समारंभात बॅग चोरणार्‍या टोळीतील मुख्य सूत्रधारास राजगढ जिल्ह्यातील बोडा येथून अटक करण्यात आली आहे. 

कुंदन हरी सिसोदिया (वय 32, रा. कडीयासासी, जि. राजगढ, मध्यप्रदेश) हे अटक केलेल्या सूत्रधाराचे नाव आहे. त्याचे साथीदार रोहन गोपाळ सिसोदिया, कुंदन सिसोदिया, संजय सिसोदिया, जुगनू सिसोदिया हे फरार आहेत. या टोळीने नगर शहरासह शिर्डी, राहाता, लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची शक्यता आहे.

11 डिसेंबर 2017 रोजी रमेश कारभारी गर्जे (वय 43, रा. भगवानगर, पाथर्डी) हे त्यांच्या भाचीच्या लग्नाच्या हळदी कार्यक्रमासाठी औरंगाबाद रस्त्यावरील शेंडी-पोखर्डीतील एका मंगल कार्यालयात गेले होते. हळद लावण्यासाठी त्यांनी हातातील बॅग खांबाला लटकवून ठेवलेली असताना 12-13 वर्षांच्या मुलाने सदर बॅग चोरून नेली होती. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी मध्यप्रदेशातील असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. 

लहान मुलांचा वापर करून ही टोळी चोर्‍या करीत असल्याचे समजले होते. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या नेतृत्वाखालील कर्मचारी योगेस गोसावी, उमेश खेडकर, दत्ता हिंगडे, अण्णा पवार आदींच्या पोलिस पथकाने मध्यप्रदेशात जाऊन आरोपींचा शोध घेतला. राजगढ जिल्ह्यातून मुख्य सूत्रधार कुंदन सिसोदिया यास अटक केली. या टोळीने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोर्‍या केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. टोळीतील इतर फरार आरोपींचाही शोध घेतला जात आहे.