Wed, Aug 21, 2019 14:46होमपेज › Ahamadnagar › उद्योजक धुरपते लंके यांच्या गोटात!

उद्योजक धुरपते लंके यांच्या गोटात!

Published On: Jun 01 2018 1:44AM | Last Updated: May 31 2018 11:35PMपारनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील जामगांव येथील उद्योजक व राष्ट्रवादीच्या पंचायत समितीच्या सदस्या सुनंदा धुरपते यांचे पती सुरेश धुरपते शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांच्या गोटात सामील झाले आहेत. धुरपते यांच्या वाढदिवसानिमित्‍त शुक्रवारी जामगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन व लंके प्रतिष्ठाणच्या शाखा उद्घाटनानिमित्‍त जोरदार शक्‍तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. 

शिवसेनेतून हाकलपट्टी झाल्यानंतर लंके समर्थकांनी गावोगावी लोकनेते नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या शाखा सुरू करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्या माध्यमातून तरूणांना संघटीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून लंके यांच्या संपर्कात असलेले उद्योजक सुरेश धुरपते यांनी आता लंके यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अधिकृत घोषणा ते आज जामगाव येथे आयोजित कार्यक्रमात करणार आहेत. 

स्वाभीमान गहाण ठेवून काम करणारांपैकी मी नाही, मी कोणासाठी काय केले हे सर्वश्रूत आहे, कोणामुळे कोणाचे राजकारण उभे राहिले व जीवंत राहिले, याची जाणीवही जनतेला आहे. आपली पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असली तरी आपण मात्र लंके यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. पारनेर मतदारसंघातील जनता बदलाच्या शोधात होती. हा शोध लंके यांचे नेतृत्व पुढे आल्याने संपला आहे. लंके यांना आमदार करण्यासाठी त्यांच्या पाठिशी खंबिरपणे उभे राहण्याचा निर्णय आपण व आपल्या समर्थकांनी घेतला आहे. सेना व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांचा केवळ वापर करून घेतला जातो. दोन्ही नेतृत्वाचे राजकारणात फिक्सींग असून ते जनतेने हेरले आहे. त्यांच्याशिवाय सामान्य घरातील मुलगा आमदार होऊ शकतो, हे दाखवून देण्याची वेळ आल्याचे धुरपते यांनी सांगितले. 

सुरेश धुरपते यांनी आमच्यासोबत काम करण्याचा घेतलेला निर्णय पूर्ण विचारांती घेतला असल्याचे नीलेश लंके यांनी सांगितले. ते आमच्यासोबत आल्याने आमचे बळ वाढले असून कार्यकर्त्यांना लढण्याची उर्जा मिळाली आहे. तालुक्यातील प्रस्तापितांनी तरूणांचा केवळ वापर करून घेतला. कार्यकर्ते दावणीला बांधल्यागत त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. हेच कार्यकर्ते पेटून उठले असून त्यांना मी पर्याय वाटू लागलो असल्याचे लंके म्हणाले.