Mon, Mar 18, 2019 19:21होमपेज › Ahamadnagar › आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना आधार

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना आधार

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 22 2018 11:10PMअकोले : प्रतिनिधी

निसर्गाचा असमतोल, त्यातून शेतीचे होणारे नुकसान, पाण्याअभावी शेती नापीक होणे, शेतकर्‍यांवर असमारे अमाप कर्ज या सारख्या असंख्य कारणांनी होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमुळे नाशिकरोडच्या साने गुरुजी शिक्षण प्रसारक संस्थेने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या आणि गरिबीमुळे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुला-मुलींसाठी मोफत शिक्षण देण्याचा संकल्प केला आहे.आपल्या गरिबीला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची मुले आणि आर्थिक परिस्थिती बेताची असणार्‍या कुटुंबातील मुलांचा वर्षाचा सर्व शैक्षणिक खर्च साने गुरुजी शिक्षण संस्था उचलणार आहे. वर्षभरात लागणारी वह्या-पुस्तके, गणवेश, शाळेत येण्यासाठी वाहन, परिक्षा शुल्क, मासिक पासचा खर्च यासारखा लहान-मोठा लागणारा सर्व खर्च संस्था करणार आहे.संस्थेच्या नाशिक व दनगर जिल्ह्यात असणार्‍या अनेक शाखेत के. जी. ते पी.जी. पर्यंत चालणारे विविध प्रकारचे अभ्यासक्रमांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी संस्थेचे 32 युनिट कार्यरत असून, भौतिक आणि शैक्षणिक साधनेही विद्यार्थ्यांना मोफत उपभोगता येणार आहेत.

संस्थेचे सचिव प्रवीण जोशी यांच्या संकल्पनेतून हा कल्याणकारी विचार पुढे आला असून, संस्थाध्यक्ष गणपतराव मुठाळ यांनीही ही काळाची गरज असल्याचे नमूद केले आहे. संस्थेच्या वतीने खजिनदार मिलिंद पांडे, राधाकृष्ण कानवडे, अनिळ अरिंगळे, डॉ. भूषण कानवडे या संस्थेच्या विश्‍वस्तांनी हा सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आणि पूर्णत्त्वास नेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या योजनेचा शुभारंभ जून 2018 पासून केला जाणार असल्याचेही संस्था सूत्रांनी स्पष्ट केले.विशेष बाब म्हणजे विद्यार्थी निवडतांना संस्थेचे शिक्षक स्वतः समस्याग्रस्त कुटुंबांना भेटी देऊन गरजुवंत मुलांचीच निवड करणार आहे. संस्थेच्या इंग्रजी शिक्षणापासून ते व्यावसायिक शिक्षणापर्यंत आवडीनुसार गरजू मुला-मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी संस्थेचे महिला महाविद्यालय, मॅनेजमेंट कोर्सेस व व्यावसायिक अभ्यासक्रमही मोठ्या प्रमाणात आहेत. समाजातील भरकटलेली मुले शिकुन त्यांनी उत्कर्ष केला पाहिजे हा या मागचा उद्देश आहे. अधिक माहितीसाठी लिंगदेव विद्यालयाचे प्राचार्य एस.पी.पुंडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.