Tue, Jun 18, 2019 20:43होमपेज › Ahamadnagar › माजी आमदार, माजी महापौर, शहराध्यक्ष झाले पोलिसांत हजर

माजी आमदार, माजी महापौर, शहराध्यक्ष झाले पोलिसांत हजर

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 06 2018 11:11PMनगर : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणातील आरोपी माजी आमदार दादा कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते हे तिघे काल (दि. 6) पोलिसांना शरण आले. अटकेची कार्यवाही करून त्यांना दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही जामीन मंजूर केला आहे. 

7 एप्रिल रोजी केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला करण्यात आला होता. याबाबत कँप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात आरोपी असलेले माजी आमदार दादा कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, प्रा. माणिकराव विधाते हे दोन महिन्यांपासून फरार होते. बुधवारी सकाळी कळमकर काका-पुतणे व विधाते असे तीन जण स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. त्यांना कँप पोलिस ठाण्यात नेऊन त्यांच्या अटकेची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. त्यानंतर दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 

गुन्ह्याचा तपास करणे, फरार आरोपींचा शोध घेणे, अज्ञात व्यक्तींची नावे निष्पन्न करणे, यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांच्यावतीने करण्यात आली. आरोपीच्या वकिलांनी बचाव करताना पोलिस कोठडी देण्याची मागणी फेटाळून लावली. आरोपी स्वतःहून हजर झालेले आहेत. आरोपीला पोलिस कोठडी देण्याची आवश्यकता नाही. त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली. आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनाविल्यानंतर आरोपीचे वकील अ‍ॅड. सतीश गुगळे यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागविले. म्हणणे सादर केल्यानंतर दोन्ही बाजूंच्यावतीने युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने तीनही आरोपींना प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जामीनाची पूर्तता करून सायंकाळी आरोपींची सुटका करण्यात आली.