Fri, Aug 23, 2019 23:26होमपेज › Ahamadnagar › मंत्रालय झाले आत्महत्यालय

मंत्रालय झाले आत्महत्यालय

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 16 2018 12:44AMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

सततची नापिकी, कर्जमाफीचा गोंधळ, सरकारचा नाकर्तेपणा, यामुळे त्रस्त झालेला शेतकरी मंत्रालयात जाऊन आत्महत्या करू लागला आहे. त्यामुळे हे ठिकाण मंत्रालय न राहता आत्महत्यालय झाले असल्याची घणाघाती टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

श्रीगोंदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पवार बोलत होते. व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, आ. दिलीप वळसे पाटील, खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. संग्राम जगताप, चित्रा वाघ, अभिषेक कळमकर, चंद्रशेखर घुले, आ. राहुल जगताप, संग्राम कोते, प्रा. तुकाराम दरेकर उपस्थित होते.

पवार म्हणाले, सरकारने आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून  कर्जमाफी केली. मात्र या कर्जमाफीचा नेमका फायदा कुणाला झाला, हे समजायला तयार नाही. हे सरकार शेतकर्‍यांच्या मुळावर उठले आहे. नोटबंदी मुळे अनेकांचे धंदे बसले, महिला सुरक्षित नाहीत, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, साखर कारखान्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे. याउलट आमच्या सरकारने  शेतकर्‍यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काम केले. दुष्काळी भागात जास्त निधी दिला. 

गारपिटीने शेतकरी उद्ध्वस्त झाला. त्याला आधार देण्याऐवजी हे सरकार त्यांची  थट्टा करण्यात धन्यता मानत आहे. ज्या ठिकाणी बसून राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतात त्याच ठिकाणी जावून लोक जर आत्महत्या करत असतील, तर हे सरकारचे मोठे अपयश म्हणावे लागेल. आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयात जाळ्या लावाल. मात्र इतर ठिकाणी होणार्‍या आत्महत्या कशा रोखणार, असा सवाल यावेळी उपस्थित केला.

मुंढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या नतद्रष्ट सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. तिसर्‍या टप्यातील आंदोलनाला श्रीगोंदा येथून सुरुवात होते आहे. या आंदोलनाचा पाचवा टप्पा पूर्ण होईल, तेव्हा हे सरकार सत्तेवर नसेल. भाजपने लोकांना फसवून सत्ता मिळविली. त्याबदल्यात सर्वसामान्यांच्या पदरात पडली महागाई, शेतकरी आत्महत्या, शेती मालाला कवडीमोल बाजारभाव. अशा सरकारला धडा शिकविण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.  शेतकर्‍याला सरसकट  कर्जमाफी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न केला. मात्र सरकारने अकरा आमदार निलंबित केले. त्यात तुमच्या मतदारसंघाचे आ. राहुल जगताप यांचाही समावेश होता. त्यामुळे आज राज्यातील किती शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, हा संशोधनाचा भाग आहे. 

खा. सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, राज्याच्या इतिहासात प्रथमच शेतकरी संपावर गेले. याच्या इतकी लाजिरवाणी बाब असू शकत नाही. हे सरकार विश्वासघातकी असून, दिलेल्या आश्‍वासनाच्या विरुद्ध हे सरकार वागत आहे. आज राज्यात कुठलाच घटक  सुरक्षित नाही. आपल्या मागण्यांसाठी सगळे रस्त्यावर उतरु लागले आहेत. राज्यातील एक हजार तिनशे शाळा बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरणार असून कोणत्याही परिस्थितीमध्ये या शाळा बंद होऊ देणार नाही. 

प्रास्ताविकात आ. राहुल जगताप म्हणाले, या सरकारने एकही लोकहिताचा निर्णय न घेतल्याने सर्वच जण अडचणीत सापडला आहेत. माजी मंत्री बबनराव  पाचपुते यांच्यावर टीका करताना आ. जगताप म्हणाले, ज्यावेळी लोकांनी काम करण्याची संधी दिली त्यावेळी हे प्रवचन करत बसले. त्यात तालुक्याचा विकास राहून गेला. मी मंजूर करून आणलेल्या कामात ते नेहमीच आडवा पाय घालतात. 35 वर्ष काम करण्याची संधी असताना त्यानी फक्त स्वहित साधले. मात्र आपण विकासासाठी कटिबद्ध आहोत. सूत्रसंचालन प्रा. दरेकर यांनी केले, तर आभार हरिदास शिर्के यांनी मानले.

तरुण आमदार आमची ऊर्जा : खा. सुळे 

खा. सुप्रियाताई सुळे यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तिन्ही तरुण आमदारांचे कौतुक केले. शेतकर्‍यांच्या हितासाठी संघर्ष करणारे हे तीन आमदार असून, ते आमच्या पक्षासाठी उर्जास्त्रोत आहेत. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खिल्ली 

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मागील काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्य दलाला तयार होण्यासाठी सहा महिने लागत असतील, तर संघाचे स्वयंसेवक तीन दिवसात तयार होतील, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा ना. धनंजय मुंढे यांनी शेलक्या शब्दात  समाचार घेतला. पाककडून गोळी आली तरी संघाचे स्वयंसेवक गोळी घालण्याऐवजी मारीन-मारीन, असे म्हणून भीती घालतील, असे ना. मुंढे म्हणताच सभास्थळी हशा पिकला.