Mon, Jun 24, 2019 21:01होमपेज › Ahamadnagar › मराठा आरक्षणासाठी विद्यार्थिनीची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी विद्यार्थिनीची आत्महत्या

Published On: Sep 11 2018 1:35AM | Last Updated: Sep 11 2018 12:25AMनगर : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली. किशोरी बबन काकडे (17, रा. कापूरवाडी, ता. जिल्हा नगर) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. त्यातच सोमवारी (दि. 10) महाविद्यालयातच विद्यार्थिनीने गळफास घेतल्याने शहरात खळबळ उडाली. याबाबत सविस्तर हकीगत अशी की, किशोरी बबन काकडे ही विद्यार्थिनी राधाबाई काळे महिला महाविद्यालयात वसतिगृहात राहत होती. ती इयत्ता अकरावीमध्ये सायन्स विभागात शिकत होती. तिने दुपारी 2 च्या सुमारास महाविद्यालयातील दुसर्‍या मजल्यावरच्या रूम नंबर 9 मध्ये छताला दोरी लटकवून गळफास घेतला.

तिने गळफास घेतल्याचे समजल्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डी. डी. पाटील यांनी तात्काळ तोफखाना पोलिसांना याबाबत कळविले. पोलिस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. पोलिसांना तिच्याजवळ चिठ्ठी सापडली. त्यानुसार तिने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आत्महत्या करत असल्याचे त्यात म्हटले आहे.

घटना घडल्यानंतर पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस अधीक्षक जयंत मीना, शहर पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक संपत शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सणस यांनी घटनास्थळी धाव घेत भेट दिली. याबाबत तोफखाना पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.