Wed, Mar 20, 2019 22:56होमपेज › Ahamadnagar › महिलेचा पोलिस ठाण्याच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न

महिलेचा पोलिस ठाण्याच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 03 2018 11:34PMश्रीगोंदा ः प्रतिनिधी

श्रीगोंदा पोलिस ठाण्यासमोर नाजुका भोसले या महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पोलिसांनी या महिलेस उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी या महिलेस नगर येथे हलविण्यात आले. हा प्रकार काल (दि.3) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.   

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी नाजुका भोसले यांनी काही नातेवाईकांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.  मात्र संबंधित आरोपींना अटक करण्यात आली नाही. दरम्यान, श्रीगोंदा पोलिसांनी या आरोपींना तडीपार का करण्यात येऊ नये, अशा स्वरूपाच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या एका आरोपीने भोसले यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. या त्रासास कंटाळून भोसले काल पोलिस ठाण्यात आल्या. पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार  यांच्यासमोर तिने आपली कैफियत मांडली. त्यानंतर या महिलेस तक्रार देण्यास सांगण्यात आले.  

भोसले यांनी पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे बाजूला उभ्या असणार्‍या पोलिसांनी त्यांच्या हातातील विषाची बाटली ताब्यात घेतली. भोसले यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सदर महिलेने कुठल्या कारणातून विष प्राशन केले, हे तिने दिलेल्या जबाबानंतर स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.