Sun, Oct 20, 2019 11:52होमपेज › Ahamadnagar › ऊसतोडीकडे शेतकर्‍यांच्या नजरा 

ऊसतोडीकडे शेतकर्‍यांच्या नजरा 

Published On: Mar 10 2018 11:52PM | Last Updated: Mar 10 2018 10:47PMभावीनिमगाव : वार्ताहर

शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने जिल्हा परिषद गट व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या धास्तावले आहेत. त्याचे कारण म्हणजे कारखान्याचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाही अनेक शेतकर्‍यांच्या ऊसाला तोड आली नाही. ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची सभासद संख्या जास्त असून नोंद देऊनही ऊस तुटण्यास उशीर होत आहे. आपल्या ऊसाला तोड देईल का नाही? कधी देईल? याचे उत्तरही शेतकर्‍यांना मिळेना. त्यामुळे ऊस तुटून गेला नाही तर खूप मोठा आर्थिक भुर्दंड शेतकर्‍यांना सहन करावा लागणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. या सर्व गोष्टींमुळे कारखाना व्यवस्थापनाविरुद्ध जनतेतून रोष निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दहिगाव ने, भावीनिमगाव, शहरटाकळी, ढोरसडेसह परिसरात जायकवाडी धरणाचे पाणी उपसा सिंचनद्वारे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने येथील शेतकर्‍यांचे ऊस हे प्रमुख पिक आहे. मागील वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या वर्षी ऊसाच्या सरासरी उत्पन्नात आणि ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांची संख्या वाढली. मात्र, ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यावर जवळपास 30 ते 45 दिवस ज्ञानेश्‍वर कारखान्याचे गाळप धिम्या गतीने चालू होते. परिणामी, अनेक ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी पाहिजे त्या कारखान्यांना ऊस पाठवला. काही शेतकर्‍यांनी चार्‍यासाठी आणि दुसर्‍या शेतकर्‍यांना बियाणे म्हणून ऊस विकून खोडवा ऊसात अंतरपीक तर काहींनी नवीन पिके घेतली.

मात्र कारखान्याशी केलेला करार आणि सभासदतत्वाशी बांधील राहत अनेक शेतकर्‍यांनी मातृसंस्था असलेल्या कारखान्यात ऊस पाठवायचा या उद्देशाने ऊस ठेवला. आता कारखाना व्यवस्थापनाचे ढिसाळ नियोजन आणि ऊसतोड टोळ्यांकडून जादा खुशालीसाठी होत असलेली अडवणूक यामुळे ऊस जायला उशीर होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. असे असतानाही कार्याक्षेत्राबाहेरील ऊस काही प्रमाणात आणला जात आहे. जवळ उपलब्ध असलेला ऊस तोडणे सोडून कारखाना बाहेरील ऊस का आणतो ? या प्रश्‍नाचे उत्तर मात्र शेतकर्‍यांना कळायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून कारखाना व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आहे. वातावरणात बदल होत असून अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. त्यामुळे कामगारांच्या कार्यक्षमतेमध्ये घट झाली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांना आता घरचा रस्ता खुणावतो आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी धास्तावले असून लवकरात लवकर ऊसतोड द्यावी अशी मागणी करत आहेत.