Fri, May 24, 2019 06:35होमपेज › Ahamadnagar › थोरात कारखाना हा तालुक्याचे हृदय : बाळासाहेब थोरात 

थोरात कारखाना हा तालुक्याचे हृदय : बाळासाहेब थोरात 

Published On: Jul 02 2018 1:41AM | Last Updated: Jul 01 2018 11:05PMसंगमनेर : प्रतिनिधी

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याला राज्यात अद्यापि तरी कुणाची नाव ठेवण्याची हिंमत झाली नाही. मात्र, ज्यांचा जनतेशी काहीच संबंध नाही ते लोक खोटे-नाटे बोलून तालुक्याच्या विकासात विष कालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा कारखाना या तालुक्याच्या विकासाचे ह्दय आहे. ते तोडण्याचा काहींचा डाव आहे. परंतु येथील जनता हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्‍वास माजी कृषिमंत्री  व आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

सहकारमहर्षी भाऊसाहेेब थोरात साखर कारखान्याच्या वतीने शेडगाव येथे आयोजित ऊस विकास मेळाव्यात ऊसउत्पादकांना मार्गदर्शन करताना थोरात बोलत होते.अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे होते. व्यासपीठावर कृषिभूषण संजीव माने, रामदास वाघ, शिवाजीराव थोरात, शंकरराव खेमनर, भाऊसाहेब कुटे, गणपतराव सांगळे,  मीराताई शेटे, नारायण नागरे, पांडुरंग घुले, इंद्रजित खेमनर, संतोष हासे, रमेश गुंजाळ कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर  उपस्थित होते. 

आ. थोरात म्हणाले की, कारखाना व सहकार आपल्या प्रपंचाशी व भाकरीशी निगडीत आहे. कोणीही येतो आणि मेळावे घेतो, अशा विष कालविणार्‍या विघ्नसंतोषी लोकांना वेळीच रोखा. कारखान्याच्या कामात आपण कधीही राजकारण आणत नाही. कधीही भेदभाव करीत नाहीत. सर्व ऊसउत्पादकांना 2300 रुपये भावाप्रमाणे वेळेत पैसे दिले. कामगारांचे पेमेंट वेळेत दिले जाते. इतर कारखान्यांनी दिले का? हे तपासून पाहा. अशा अपप्रवृत्तींना वेळीच रोखा, असे आवाहन करताना कमी श्रमात जादा उत्पादन करताना ठिंबक सिंचनाचाच वापर करावा व कार्यक्षेत्रात सुमारे 14 लाख मे. टन ऊसउत्पादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

अ‍ॅड. माधवराव कानवडे म्हणाले की, संगमनेरच्या सहकारातून अनेक माणसे मोठी झाली. यातील काही नतदृष्ट लोक याच कामावर टीका करतात, हे अत्यंत वाईट आहे. यावर्षी साखरेचे भाव कमी झालेले असतानाही एफआरपीपेक्षा 200 रुपये जादा भाव दिला आहे. जे आपल्या कारखान्याविषयी बोलतात, त्यांनी  शेतकर्‍यांचे पैसे दिले का ? हे अगोदर  तपासा आणि नंतरच बोलावे, अशी टीका त्यांनी केली.

जि. प. माजी सभापती आणि कारखान्याचे संचालक गणपतराव सांगळे म्हणाले की, अनेकजण स्वत:चे दुकान चालविण्यासाठी थोरात कारखान्यावर टीका करतात. पण जेथे राज्यात गौरव होतो. त्यावर तुम्ही काय बोलता. तुम्ही जाहीर केलेला भाव तरी देतात का? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी, तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी आभार मानले.