Sun, Mar 24, 2019 06:12होमपेज › Ahamadnagar › मुख्यमंत्र्यांना पाठविली साखर!

मुख्यमंत्र्यांना पाठविली साखर!

Published On: Jun 06 2018 1:41AM | Last Updated: Jun 05 2018 11:37PMनगर : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर, तर गुजरात, आंध्र व कर्नाटकचे भेसळयुक्त दूधाचा आहेर आणूून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच शेतकर्‍यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंग व सिने अभिनेत्री रविना टंडन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास भेसळयुक्त दूध पाजून निषेध व्यक्त करण्यात आला.  

दूध व शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी चालू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पिपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या प्रतिकात्मक अस्थिकलशाला अभिवादन करून या आंदोलनास प्रारंभ करण्यात आले. ‘शेतकरी वाचवा, आत्महत्या थांबवा’च्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून निघाला. या आंदोलनात अ‍ॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, कॉ.महेबुब सय्यद, शाहीर कान्हू सुंबे, वीरबहादूर प्रजापती, एम.डी. ढाळे, लक्ष्मण बोठे, जालिंदर चोभे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी आणलेली पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर व भेसळयुक्त दूध निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या टेबलवर ठेवले असता, पोलिसांनी तातडीने ते ताब्यात घेतले. या दरम्यान आंदोलकांची व निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची शाब्दिक चकमक उडाली.  

शेतकर्‍यांच्या शेती मालाला योग्य भाव देण्याऐवजी सरकारने पाकिस्तानची साखर तर मोझांबिक देशातून तूर आयात केली. डेअरी व दूध संघवाले शेतकर्‍यांकडून दूध कमी भावाने घेवून एका टँकरचे तीन भेसळयुक्त दुधाचे टँकर करुन मालामाल होत आहेत. दुधाला भाव देण्याऐवजी दूध पावडर बनविणार्‍या कारखान्यांना अनुदान देवून शेतकरी संपविण्याचा घाट सत्ताधार्‍यांचा घातल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला.