Thu, Jun 20, 2019 06:31होमपेज › Ahamadnagar › साखर निर्यातीला अनुदान देणे गरजेचे : राधाकृष्ण विखे पाटील 

साखर निर्यातीला अनुदान देणे गरजेचे : राधाकृष्ण विखे पाटील 

Published On: May 03 2018 1:27AM | Last Updated: May 02 2018 11:13PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

यावर्षीचा ऊस गळीत हंगाम मोठा झाला असला, तरी साखरेचे भाव पडल्याने कारखानदारी अडचणीत आली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखविण्यापेक्षा साखर निर्यातीसाठी प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असा आग्रह आपला मुख्यमंत्र्यांकडे आहे. शेतकर्‍यांच्या मालकीची असलेली सहकारी साखर कारखानदारी आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली

प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 68 ऊस गळीत हंगामाची सांगता शालिनी व राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते झाली. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के तर व्यासपीठावर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, प्रवरा बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, उपाध्यक्ष अशोक असावा, ट्रक वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, पं. स. उपसभापती बाबासाहेब म्हस्के, विखे कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे,  माजी सभापती भाऊसाहेब कडू आदी उपस्थित होते.

ना. विखे म्हणाले, या वर्षीचा ऊस गळीत हंगाम सुरू झाला. तेंव्हा साखरेला 3 हजार 150 रुपये भाव होता. हंगामाची सांगता होताना तो 2 हजार 550 एवढा खाली आला आहे. मोलासेसचे दर कमी व्हायला तयार नाहीत. इथेनॉल पाच टक्यांवरुन दहा टक्यापर्यंत वापरावेत म्हणून अनेक दिवसांपासून आम्ही मागणी करीत आहोत, मात्र सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. टनामागे 800 रुपये तोडणी व वाहतूक खर्च येतो. 300 ते 400 रुपये व्यवस्थापन खर्च होतो. अशा अवस्थेत कारखानदारी चालवणे कठीण होऊन बसले आहे. 

शेतकर्‍यांची सहकारी कारखानदारी मोडून पडली तर पुन्हा उभी राहू शकणार नाही. आम्ही स्पर्धेला घाबरत नाही पण सरकारची धोरणं समान नाहीत. सध्याच्या उद्भवलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून काही मागण्या केल्या आहेत. सरकारने त्यानुसार तात्काळ निर्णय घेतले तरच ही कारखानदारी टिकाव धरू शकेल, असे मत व्यक्त करताना पुढील वर्षी यावर्षीपेक्षा जास्त साखर उत्पादन होणार असल्याने साखर कारखानदारीपुढे आगामी काळ अतिशय संकटांचा असल्याचेही ना. विखे यांनी यावेळी नमूद केले.

प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे म्हणाले, यावर्षी कारखान्याने 9 लाख 79 हजार टन उसाचे गाळप करून 11.91 हा विक्रमी साखर उतारा मिळवला आहे.  हा जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा आहे. प्रवरा कारखान्याचा गळीत हंगाम 170 दिवस चालला. दररोज सरासरी 5 हजार 804 गाळप करून नवा उच्चांक निर्माण केला आहे. भविष्यातही शेतकर्‍यांच्या विश्‍वासावर प्रवरा विक्रमी गाळप करेल, असा विश्‍वास व्यक्त केला.