Tue, Mar 19, 2019 09:16होमपेज › Ahamadnagar › कर्मचारी आत्महत्याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करा!

कर्मचारी आत्महत्याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करा!

Published On: May 06 2018 1:06AM | Last Updated: May 05 2018 10:53PMनगर : प्रतिनिधी

मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी बाळू नारायण भाकरे याच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिले आहेत. त्यामुळे कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली.

मयत भाकरे यास 29 एप्रिल व 30 एप्रिल रोजी मारहाण व दमदाटीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी आकाश दिलीप डागवाले व सागर दिलीप डागवाले यांच्यावर तोफखाना व एमआयडीसी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मात्र, फिर्याद दिल्यानंतर पुन्हा भाकरे यांना मारहाणीची धमकी देण्यात आली होती. त्या भीतीपोटीच भाकरे याने 3 मे रोजी आत्महत्या केली आहे. त्यामुळे या दोघांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी युनियनच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली होती. महापौर व मनपा आयुक्‍तांनी या संदर्भात पोलिस अधिक्षकांनाही पत्र देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. 

काल (दि.5) महापौर सुरेखा कदम, महिला बालकल्याण समितीच्या सभापती सारिका भुतकर, युनियनचे अध्यक्ष लोखंडे, सचिव आनंदराव वायकर, आयुब शेख, अकिल सय्यद, विजय बोधे, विठ्ठल उमाप, पाशा शेख, बलराज गायकवाड यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मारहाणीच्या भीतीपोटीच भाकरे याने आत्महत्या केली असल्याने दोन्ही दोषींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली. पोलिस अधिक्षकांनी नगर तालुका पोलिस ठाण्याच्या संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करुन दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले असल्याचे लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी पुकारण्यात आलेले मनपा कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलनही स्थगित करण्यात आल्याचे लोखंडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.