Sat, Apr 20, 2019 07:58होमपेज › Ahamadnagar › शाळेच्या पहिल्याच दिवशी १०वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

शाळेच्या पहिल्याच दिवशी १०वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 16 2018 12:08AMजामखेड : प्रतिनिधी

जामखेड शहरातील विठ्ठल मंदिराजवळ राहत असलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरातील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दहावीच्या प्रवेशासाठी शाळेत जाऊन चौकशी करून आल्यानंतर दुपारच्या वेळी तिने हे कृत्य केले. तिच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.रेणूका राम काकडे (16) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. मयत रेणूका हिने नववीपर्यंतचे शिक्षण तिच्या मामाच्या गावात घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती आपल्या आई-वडिलांकडे जामखेडला आली होती.

काल (दि. 15) ती येथील नागेश विद्यालयात दहावीच्या प्रवेशाची चौकशी करण्यासाठी गेली होती. त्यानंतर दुपारी घरी आल्यावर दुपारी तीनच्या सुमारास ती घरातील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत घरच्या लोकांना आढळून आली.या घटनेची माहिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. 

त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी  ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथे डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सदर काकडे कुटूंब हे सर्वसामान्य असून, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. मयत रेणूका हिच्यामागे आई, वडील व एक बहिण असा परिवार आहे.तिच्या आत्महत्यचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शाळेच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. 

याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटना घडलेल्या ठिकाणी पोलिसांनी कुलूप लावले आहे. पुढील  तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बापूसाहेब गव्हाणे करीत आहेत.