Sat, Jul 20, 2019 02:55होमपेज › Ahamadnagar › विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न

विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न

Published On: Mar 02 2018 1:20AM | Last Updated: Mar 02 2018 1:00AMनेवासा: प्रतिनिधी 

नेवासा शहरातील एका माध्यमिक शाळेतून 8 वीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र शिक्षकामुळे हा प्रयत्न फसला. या प्रकरणी 6 तरुणांना नेवासा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नेवासा शहरातील एका माध्यमिक विद्यालयासमोर काल (दि.1) सकाळी 11 वाजेच्या सुमारास कारने (क्र. एमएच-20 एजी- 6232) सहा तरुण आले. या कारमधून आलेल्या गणेश बबन पवार याने थेट  वर्गात जाण्याचा प्रयत्न केला. याचवेळी मुख्याध्यापकांनी त्यास अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच विचारपूस केली असता, त्याने संबंधित विद्यार्थिनीस नेण्यासाठी आलो आहे. तिची आई आजारी असल्याची बतावणीही पवार याने केली.

त्यास विद्यार्थिनीचे अडनाव व त्याच्या नावात फरक  वाटल्याने संशय बळावला. तेव्हा शिक्षकांनी त्याची चौकशी केली. तसेच विद्यार्थिनीच्या घरी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता तिची आई आजारी नसल्याने समजले. त्यामुळे शिक्षकांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी गणेश बबन पवार (रा. सुरेगाव, ता. नेवासा) यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने या विद्यार्थिनीचे अपहरण करणार होतो, असे सांगितले.

पोलिसांनी वेगात सूत्रे हलवली. पोलिस कर्मचारी संदीप दरंदले व सहकार्‍यांनी नेवासा शहरातून संकेत अशोक शिंदे, किशोर रामेश्वर गिरी, समाधान सुखदेव स्वर, सुनील भारत शिंदे, रामेश्वर विलास काळे (सर्व रा. सुरेगाव, ता. नेवासा) यांना ताब्यात घेतले. पोलिस कारचा शोध घेत आहेत. शिक्षकांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला. मुख्याध्यापकांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात अपहरणाचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे पुढील तपास करीत आहेत.नेवासा पोलिसांनी त्वरित केलेल्या या कार्यवाही पालकवर्गातून समाधान व्यक्त होत असून, शाळा, महाविद्यालय, बस स्थानक या ठिकाणी पोलिसांनी गस्त घालून टारगटांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.