Mon, Jul 22, 2019 04:42होमपेज › Ahamadnagar › कर्जत तालुक्यात उभी राहिली जलचळवळ

कर्जत तालुक्यात उभी राहिली जलचळवळ

Published On: May 26 2018 1:49AM | Last Updated: May 25 2018 10:58PMकर्जत : गणेश जेवरे

दुष्काळाचे चटके कर्जत तालुक्यातील जनतेने अनेक वर्षे सोसले आहेत. राज्यात युती सरकारने जलयुक्‍त शिवार योजना सुरू केली. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मंत्रीपदाचा पुरेपुर फायदा कर्जत तालुक्याला मिळवून दिला. त्याला तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी जोरदार कामे करीत चांगली साथ दिली. त्यामुळे तालुक्यातील जनतेला दुष्काळाचे चटके कमी बसू लागले आणि त्यातच अमीरखान यांच्या पाणी फौंडेशनने आयोजित केलेल्या वॉटरकप स्पर्धेत तालुक्यातील 41 गावांनी सहभाग नोंदवला. दुष्काळाचे मळभ कायमचे दूर करण्यासाठी कर्जत तालुक्यातील जनता एकवटली अन् जलचळवळ सुरू झाली.

गेले 45 दिवस वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने तालुक्यातील अनेक गावांमध्ये भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी, विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक संघटना, महिला संघटना, पत्रकार संघटना, काही राजकीय नेते यांनी रोज सकाळी जाऊन श्रमदान केले. खरच एक वेगळा न विसरता येणारा अनुभव अनेकांनी अनुभवला. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांना जवळून अनुभव घेताना जाणवले की, कोणालाही पदाचा गर्व नाही. यामध्ये प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण सावंत, तालुका कृषि अधिकारी व रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र सुपेकर व इतरही विभागातील अधिकार्‍यांनी रोज सकाळी एका गावामध्ये जाऊन श्रमदान केले. त्यांच्यासोबत भारतीय जैन संघटनेचे तालुका अध्यक्ष अभय बोरा, समन्वयक व पत्रकार आशिष बोरा, त्यांचे सर्व पदाधिकारी, रोटरीचे भावी अध्यक्ष नितीन देशमुख, डॉ. संदीप काळदाते, डॉ. खेत्रे, दयानंद पाटील, घन:श्याम नाळे व इतर सर्व सदस्य, मनिषा सोनमाळी व मिनाक्षी साळुंके यांच्या महिला संघटनाच्या सदस्या, बाळासाहेब साळुंके यांचा संघ, सामाजिक कार्यकर्ते कालिदास शिंदे, शिक्षक संघटना, मेडिकल संंघटना असे कर्जत शहरातील अनेकजण यामध्ये सहभागी होत होते. हा या सर्वांचा दिनक्रम झाला होता. प्रत्येक जण सोशल मीडियावर कोणत्या गावाला जायचे, हे आदल्या दिवशी जाहीर करीत आणि लगेच चला उठा सकाळ झाली, श्रमदानाची वेळ झाली, असे म्हणत पहाटे पाच वाजता घरा बाहेर पडत. तालुक्यातील दूरगाव, कुंभेफळ, बजरंगवाडी, डिकसळ, टाकळी, गोंदर्डी अशा गावांमध्ये जाऊन त्या गावातील लोक येण्यापूर्वी एक तास श्रमदान करीत. अनेक वेळा त्यांनी श्रमदान करताना काढलेल्या छायाचित्रांमुळे टीकाही झाली. छायाचित्रांसाठी ही मंडळी श्रमदान करीत असल्याचे बोलले गेले. मात्र प्रत्यक्षात ज्यांनी कधीच हातामध्ये टिकाव आणि खोरे घेतले नव्हेत असे अनेक हात रोज माळराणावर, डोंगरांवर, टेकड्यांवर हातामध्ये टिकाव आणि खोरे घेऊन एक तास घाम गाळत होते. 

कोणते काम करायचे, हे ग्रामस्थ आगोदरच फक्‍की मारून आखून ठेवत. रोजगार हमी योजनेचे किमान सरासरी दोन मष्टर भरतील एवढे काम कर्जत शहरातील सर्वांनी केले आहे. या कामांचे मूल्यमापन केले तर ते काही कोटींचे भरेल. यामध्ये महिलांचेही कौतुक करावे तेवढे कमी आहे. सकाळी उठून स्वत:च्या घरामधील कामे बाजूला ठेवून त्या रोज श्रमदान करतात, ही बाब कौतुकास्पद आहे. हे काम करतानाच मुळेवाडी रस्त्यावर पडलेला मोठा खड्डाही श्रमदानातून बुजविण्यात आला. 

दिशा दिली

कर्जत शहरातील या सर्वानी प्रत्येक गावामध्ये श्रमदान केल्याने त्या गावातील सर्व नागरीक गट, तट, राजकारण बाजूला ठेवून गावासाठी रोज श्रमदान करीत होते. यामध्ये त्या गावातील अनेक जण 45 दिवस इतके राबले की, ते कर्जत शहरामध्ये फिरकले देखील नाही. 

पावसाळ्यात चित्र बदलेल

वॉटरकप स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या ज्या गावांनी 20 गुण मिळविले आहेत. त्या गावाना जैन संघटनेने मोफत जेसीबी दिला. त्यामुळे त्या गावामध्ये पडणार्‍या पावसाचा प्रत्येक थेंब अडविला जाणार आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. जेव्हा पाऊस पडेल आणि या सर्व गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी अडविले जाईल तेव्हा श्रमदान करार्‍यांची छाती अभिमानाने नक्कीच फुगेल.

पुढेही अभियान सुरू राहणार

कर्जत शहरामधील सहभागी सर्व अधिकारी आणि सामाजिक संघटनांनी दर रविवारी अशा प्रकारे एका गावामध्ये जावून श्रमदान करून ही मोहीम पुढेही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उर्वरित गावांनाही ‘चला उठा श्रमदानाची वेळ झाली’ हा संदेश मिळणार आहे.

युवकांची मदत

या वॉटरकप स्पर्धेमध्ये नितीन देशमुख यांनी त्यांच्या काळातील 12 वीच्या बॅचला एक दिवस बोलावले. हे सर्वजण बाहेरगावी असतात. यात कोणी अधिकारी, कोणी डॉक्टर, कोणी व्यावसायिक आहेत. या सर्वांनी किमान एक दिवस श्रमदान केले. तसेच जेसीबीच्या डिझेल खर्चासाठी 5 हजार रूपये देताना आगळीवेगळी सामाजिक बांधलिकी जपली. या व अशा अनेकांच्या योगदानामुळे ही स्पर्धा निश्‍चितच प्रेरणादायी ठरणार आहे.