Mon, Mar 18, 2019 19:21होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यात कडकडीत बंद

जिल्ह्यात कडकडीत बंद

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 10 2018 12:56AMनगर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (दि. 9) पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्‍काजाम करीत सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजारपेठांतील व्यवहार बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. सर्वच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. 

बंददरम्यान, एसटीसह खासगी मालवाहतूक करणारी वाहने रस्त्यावर न आल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. किरकोळ अपवाद वगळता बंद शांततेत पार पडला.नगर शहरात जुन्या बसस्थानक चौकात गुरुवारी सकाळपासूनच ठिय्या आंदोलन करून औरंगाबाद व पुण्याकडे जाणारा महामार्ग रोखण्यात आला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आ. संग्राम जगताप, महापौर सुरेखा कदम यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी तसेच मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनात तरूणांसह महिला, युवतींचा सहभागही लक्षणीय होता. शहरातील सर्व बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. प्रोफेसर कॉलनी चौकातील एक कॉफी शॉपच्या काचा फोडणे आणि एमआयडीसीतील कंपन्या बंद करण्यासाठी दगड फेकण्याच्या घटना वगळता बंद शांततेत पार पडला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत आंदोलनावर ड्रोन कॅमेर्‍याद्वारे नजर ठेवली होती. 

दक्षिण भागातील नेवासा, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, पारनेर, पाथर्डी आदी तालुक्यांच्या ठिकाणीही  रास्तारोको करीत कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी आठवडे बाजारही बंद ठेवला होता. एसटी सेवा बंद असल्याने सर्वच आगारांमध्ये शुकशुकाट होता. 

बंदमुळे बाजारपेठाही ओस पडल्या होत्या. रॅलीने येत कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. पाथर्डी तालुक्यातील मढी येथे भजन व अर्धनग्न आंदोलन करीत ठिय्या देण्यात आला. पाथर्डी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर तनपूरवाडी येथे आंदोलकांनी निषेध म्हणून  रस्त्यावर टायर जाळले. आग विझविण्यासाठी आलेल्या नगर परिषदेच्या अग्निशमन वाहनावर अज्ञात युवकांच्या गटाने दगडफेक करून काचा फोडल्या. जामखेडमध्ये तब्बल आठ तास चक्‍काजाम आंदोलन सुरू होते. पारनेरमध्ये सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून स्मशानभूमीत दहन करण्यात आले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. 

उत्तर नगर जिल्ह्यातही ठिकठिकाणी चक्काजाम, ठिय्या आंदोलन, मोटारसायकल रॅली, निषेध सभा व कडकडीत बंद पाळून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. शाळा, महाविद्यालये व सर्व दुकानेही बंद ठेवण्यात आले होते. तसेच एसटी बस व खासगी प्रवाशी वाहतूकही ठप्प असल्याने शुकशुकाट होता. श्रीरामपूर शहरात महात्मा गांधी पुतळा येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. राहुरी शहरातून जाणार्‍या नगर-मनमाड महामार्गावर सकाळी 9 पासून चक्काजाम करण्यात आला. याठिकाणी सत्यनारायण महापूजा, जागरण गोंधळ व भारूडाच्या कार्यक्रमातून मराठा समाजाने सरकारवर आसूड उगारला. संगमनेरात मोटारसायकल रॅली काढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दिवसभर नवीन नगर रोडवरील बसस्थानकाजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. कडकडीत बंद पाळून प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. अकोले तालुक्यात कोल्हार- घोटी राज्य मार्गावर तब्बल चार तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

आ. वैभव पिचड आदींसह नेत्यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावून पाठिंबा दर्शवला. कोपरगाव शहरात ठिकठिकाणी रास्तारोको व ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. स्नेहलता कोल्हे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकार अनुकूल असून, हेच सरकार आरक्षण मिळवून देईल, अशी ग्वाही दिली. राहाता तालुक्यातून जाणारा नगर-मनमाड राज्यमार्गावर रास्तारोको करून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, आंदोलनात एका तरूणाने हातावर ब्लेडने वार करून घेतले. तर दुसरा एक तरूण टायर पेटनून देताना भाजला. या दोघांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उत्तरेत शांततेत आंदोलन पार पडले. जिल्ह्यात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तैनात असल्याने कुठेही हिंसक वळण न लागता आंदोलन शांततेत पार पडले.