Wed, Oct 16, 2019 19:53होमपेज › Ahamadnagar › नगरपरिषद कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

नगरपरिषद कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

Published On: Aug 14 2018 1:11AM | Last Updated: Aug 14 2018 12:05AMजामखेड : प्रतिनिधी

खैरी नदीपात्रातून वाळूतस्करांना वाळू उचलण्यास तलाठी शिवाजी हजारे यांनी प्रतिबंध केला. त्यामुळे वाळूतस्करांनी तलाठी व तहसीलदारांवर सशस्त्र हल्ला केला. या प्रकरणी तलाठी संघटना व नगरपरिषद अधिकारी, कर्मचार्‍यांनी या घटनेचा निषेध करून आरोपींना अटक होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. हल्ला प्रकरणी जामखेड पोलिसांत एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जामखेड पोलिसांत कामगार तलाठी शिवाजी सखाराम हजारे यांनी फिर्याद दिली आहे. धनेगाव शिवारातील खैरी नदीपात्रात रात्री बाराच्या सुमारास  कामगार तलाठी शिवाजी हजारे, विकास मोराळे, प्रशांत कांबळे हे तिघेजण गेले होते. त्यावेळी वाळूतस्कर वाळूचा उपसा करत होते. त्यांना प्रतिबंध केला असता, वाळूतस्कर महेश शिंदे (रा. चिंचपूर, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), अमित देशमुख, दादा काळे, योगेश काळे (सर्व रा. धनेगाव) व इतर अनोळखी पाच जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तुम्ही येथून चालते व्हा, नाही तर तुमचे मुडदे पाडू, अशी धमकी दिली. 

तहसीलदार विशाल नाईकवडे हे खासगी वाहनाने घटनास्थळी आले असता, आरोपी दादा काळे याने त्यांच्या हातातील कुर्‍हाड तहसीलदारांच्या दिशेने भिरकावली. ती तहसीलदारांनी चुकवली. त्यामुळे ते बालंबाल बचावले.  त्यानंतर आरोपी अमित देशमुख, योगेश काळे व इतर पाच अनोळखी यांनी हजारे यांना मारहाण करून ढकलून दिले. तसेच सर्व आरोपी वाळूचा टिपर घेऊन पळून गेले.

तहसीलदार व तलाठ्यावर हल्ला झाल्याने काल (दि.13) कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केले. जामखेड तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष एस. के. कारंडे, उपाध्यक्ष आय. एन. काळे, सरचिटणीस व्ही. व्ही. मोराळे, बी. एस. लटके, जी. एम. गर्कळ, जखमी तलाठी यांच्यासह संघटनेच्या सर्व सदस्यांनी तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले. जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 

जामखेड नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून तहसीलदार विशाल नाईकवडे हे काम पाहात आहेत. त्यामुळे नगरपरिषदेचे अधिकारी आजिनाथ गिते, अजय देशमुख, राजेंद्र गायकवाड, अनिल टेकाळे, शिवाजी डिसले यांच्यासह 100 च्या आसपास कर्मचार्‍यांनी नायब तहसीलदार विजय भंडारी व पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी निवेदन देऊन आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली. तसेच कामबंद आंदोलन केले.