Tue, Jul 16, 2019 10:17होमपेज › Ahamadnagar › तुघलकी धोरण थांबवा!

तुघलकी धोरण थांबवा!

Published On: Aug 25 2018 1:12AM | Last Updated: Aug 25 2018 1:12AMनेवासा : प्रतिनिधी

एकाच कुटुंबातील थकबाकीदार सदस्यांकडील कर्ज थकबाकीच्या नावाखाली स्वतंत्र खातेदार असतानाही इतर सभासदांची पीक कर्जासाठी जिल्हा बँकेकडून नाहक केली जाणारी अडवणूक थांबवून बँकेच्या धोरणामुळे पीक कर्जापासून वंचित राहणार्‍या शेतकर्‍यांना कर्ज पुरवठा करण्याचे धोरण घेण्यात यावे, असे पत्र ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी जिल्हा बँकेला दिले आहे. या पत्राच्या प्रति बँकेचे अध्यक्ष अध्यक्ष सीताराम गायकर, उपाध्यक्ष, आ. शिवाजी कर्डीले, माजी आ. घुले, माजी आ. अभंग यांच्यासह कार्यकारी अधिकार्‍यांना पाठविल्या आहेत.

पत्रात गडाख यांनी म्हटले आहे की, साधारणपणे एका शेतकरी कुटुंबात वृद्ध आई-वडिलांसह शेतकर्‍याची पत्नी व मुले स्थानिक सहकारी सेवा संस्थेचे सभासद असतात. मात्र यापैकी एखादाही सभासद कर्ज थकबाकीदार असल्यास त्या कुटुंबातील इतर नियमीत चालू खातेदारास ऊस पिकासाठी कर्ज पुरवठा न करण्याचे तुघलकी धोरण जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाने अवलंबिल्याने शेतकरी मोठ्या सुलतानी संकटात सापडल्याकडे गडाख यांनी याद्वारे लक्ष वेधले आहे. वास्तविक पाहता शासन निर्णयानुसार एकत्र कुटुंबात आई-वडील तसेच 18 वर्षांखालील अपत्याचा समावेश होत असताना बँकेनेही हाच निकष लावून वंचित शेतकर्‍यांना पीक कर्ज देण्याची अपेक्षा गडाख यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा बँक व्यवस्थापनाच्या अशा जाचक धोरणांमुळेच पात्र असूनही बर्‍याच खातेदारांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. जिल्हा बँक व्यवस्थापनाच्या या द्राविडी प्राणायामाने बरेचसे खातेदार राष्ट्रीयकृत बँकेकडे चालल्याकडे गडाख यांनी लक्ष वेधून राष्ट्रीयकृत बँकेत स्वतंत्र 7/12 उतारा पहिला जातो, एकत्र कुटुंब पाहिले जात नसल्याचा चिमटा त्यांनी यानिमित्ताने काढला आहे. 

जिल्हा बँक व्यवस्थापनाने येत्या संचालक मंडळाच्या सभेत या जाचक अटी रद्द करण्याबाबत निर्णय घेऊन पीक कर्जासाठी अडवणूक थांबविण्याचे आवाहन गडाख यांनी केले असून बँकेने त्वरित मिटिंगमध्ये निर्णय घ्यावा असे पत्रात म्हटले आहे.

बँकेच्या या जाचक अटीमुळे अनेक शेतकर्‍यांना पीक कर्जापासून वंचित राहावे लागते. बँकेने लवकरात लवकर शेतकर्‍यांच्या बाजूने निर्णय घ्यावा, ही माजी आ. शंकरराव गडाख यांचीही मागणी आहे. नेवासा येथील जाहीर कार्यक्रमात त्यांनी ही मागणी पूर्वीच केली आहे.