होमपेज › Ahamadnagar › रस्तादुरुस्तीसाठी व्यापार्‍यांचा ‘रास्ता रोको’

रस्तादुरुस्तीसाठी व्यापार्‍यांचा ‘रास्ता रोको’

Published On: Jan 19 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 10:39PM



कोपरगाव : प्रतिनिधी

गोदावरी पेट्रोलपंप ते जुना टाकळी नाका वर्षांनुवर्षे खितपत पडलेल्या या रस्ताकामाला त्वरित सुरुवात करावी, यासाठी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.   

महासंघाचे कार्याध्यक्ष अजित लोहाडे, महासचिव सुधीर डागा, उपाध्यक्ष प्रकाश कवडे व  परिसरातील 100 ते 150 व्यापारी, दुकानदारांनी नगरपालिकेला उपोषणाचा इशारा देताच त्याला नगराध्यक्ष व भाजप सेनेचे नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी अनुकूलता दर्शवित या कामाचा प्रारंभ 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार असल्याचे जाहीर करताच दोन तास चाललेले धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. 

कोयटे म्हणाले की, सन 1980-81 पासून या परिसरात आपण राहतो. तेव्हापासून हा रस्ता तसाच पडला आहे. बाजार समिती आवारातून पावसाळ्यात येणार्‍या पाण्यामुळे हा रस्ता सतत उखडला जातो. त्यासाठी कायमस्वरुपी त्यावर तोडगा काढावा. या भागात अनेक उपनगरे वाढली असून वर्दळीचा रस्ता असल्याने महिला, नागरिक, मुले, व्यापार्‍यांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो. सदरचा रस्ता तालुका व्यापारी महासंघ व समता नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चौकाच्या सुशोभीकरणासाठी करण्यास तयार आहोत. या भागातील परिसरातला ‘गौतमबुद्ध नगर’ तर रस्त्याला गोदावरी रस्ता असे नामकरण करावे अशी संकल्पना मांडली. 

पराग संधान म्हणाले, विशेष रस्ते अनुदान अंतर्गत आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शहरातील सात रस्त्यांना 3 कोटी रुपये निधी मंजूर करून दिले आहे. त्याच्या निविदा नुकत्याच काढल्या असून ठेकेदार बाळासाहेब कुर्‍हाडे यांना त्याचे काम देण्यात आले आहे. 

नगराध्यक्ष वहाडणे यांनी सदरचा रस्ता 11 लाखांवरून 33 लाखांवर गेला आहे. लोकसहभागाशिवाय व उच्च प्रतीच्या कामाशिवाय विकास शक्य नाही. कैलास जाधव यांनी पालिकेचे ठेके घेण्यास कोणी तयार नाही, घेतले, तर त्याचे पैशाची गॅरंटी नाही. त्यामुळे कोणी काम करण्यास धजावत नाही, असे सांगितले. यावेळी लोहाडे, सुहासिनी कोयटे, वैशाली जाधव, राजेंद्र सोनावणे, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे आदींची या प्रश्नी भाषणे झाली.