Tue, Mar 26, 2019 01:40होमपेज › Ahamadnagar › परराज्यातील दूध खरेदी बंद करावी 

परराज्यातील दूध खरेदी बंद करावी 

Published On: May 17 2018 1:37AM | Last Updated: May 16 2018 11:51PMराहाता : प्रतिनिधी

दूध व्यवसायासह कोणत्याही शेती उत्पादनाला हमीभावाचे संरक्षण देण्याचे सरकारचे धोरण नाही. दूध भुकटीला 3 रुपयांचे अनुदान देऊन सरकार मेहरबानी करीत नाही. राज्य सरकारने परराज्यातील दुधाची 3 महिने खरेदी बंद करून तोटा भरून काढण्यासाठी प्रयत्न करावेत, राज्यातील दूधउत्पादकांच्या बँक खात्यात प्रतिलिटर 10 रुपयांचे अनुदान सरकारने तातडीने जमा करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तालुक्यातील शिंगवे येथे कै.नामदेवराव परजणे पाटील गोदावरी सहकारी दूधउत्पादक संघाच्या सहकार्याने बालाजी सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या वतीने आयोजित दूधउत्पादक शेतकरी मेळाव्यात ते  बोलत होते.

गोदावरी सहकारी दूधउत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास हरी पगारे, तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख, काँग्रेसचे राहाता तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, अ‍ॅड. काळवाघे, नानासाहेब काळवाघे, योगेश जपे, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, नायब तहसीलदार राहुल कोताडे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे उपस्थित होते.

ना. विखे म्हणाले की, शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून सुरू झालेला दूधव्यवसाय हा ग्रामीण भागाचा आत्मा बनला. यातून माणसे उभी राहिली. या व्यवसायात स्पर्धा वाढली असली, तरी आर्थिक उदरनिर्वाह होत आहे. मध्यतंरीच्या काळात दुधातील भेसळीच्या प्रकारामुळे हा व्यवसाय बदनाम झाला. दूधधंद्याला आवश्यक असलेले नवीन तंत्रज्ञान दुर्दैवाने विकसित झाले नाही, याची खंत व्यक्‍त कतानाच आज व्यवसायात स्पर्धा वाढली असली तरी दूध उत्पादकांना 27 रुपये भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दूध संघाच्या कामाचा आढावा घेऊन दूध संघाच्या माध्यमातून 12 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचे सांगितले. दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकर्‍यांसाठी विविध योजनाही सुरू करण्यात आल्या असून दूधउत्पादक शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याची खंबीर भूमिका असल्याचे परजणे यांनी आवर्जून सांगितले. या मेळाव्यास कोपरगाव, राहाता आणि राहुरी तालुक्यांतील दूध उत्पादक शेतकरी, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते  व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.