Thu, Jul 18, 2019 00:02होमपेज › Ahamadnagar › दुधाला हमी भावासाठी राज्यव्यापी आंदोलन

दुधाला हमी भावासाठी राज्यव्यापी आंदोलन

Published On: Apr 27 2018 12:51AM | Last Updated: Apr 26 2018 11:24PMनगर : प्रतिनिधी

राज्य शासनाने दुधाला 27 रुपये लिटर हमी भाव जाहीर केलेला आहे. प्रत्यक्षात दुधाला 19 ते 21 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. शेतकर्‍यांच्या होणार्‍या लुटीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दूध उत्पादक संघर्ष कृती समितीचे निमंत्रक कॉ. डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.

शहरातील सर्जेपुरा भागातील रहेमत सुलतान सभागृहात दूध उत्पादक संघर्ष कृती समितीची कॉ. नवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. गुलाबराव डेरे, संतोष वाडेकर, अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, दिगंबर तुरकणे, आबीद खान, कॉ. मेहबूब सय्यद आदी उपस्थित होते. यावेळी कॉ. नवले म्हणाले, राज्य शासनाने दुधाला 27 रुपये लिटर हमी भाव जाहीर केलेला आहे. प्रत्यक्षात 19 ते 21 रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. प्रत्येक लिटरमागे 10 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. शासनाने दूध व्यावसायावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. त्याचा गैरफायदा खाजगी दूध प्रक्रि या घेऊन शेतकर्‍यांची लूट करीत आहेत. 

संघर्ष कृती समितीच्या वतीने दुधाला हमी भावासाठी राज्यव्यापी आंदोलन  छेडण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली जाणार आहे. नगर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या उत्पादक जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना एकत्र करून बैठका घेतल्या जाणार आहेत. या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी दि.3 ते 9 मे दरम्यान शासकीय कार्यालयात मोफत दूध दिले जाणार आहे. या सप्ताहानंतर ही शासनाला जाग न आल्यास समितीतील निर्णयानुसार दि.1 जूनपासून राज्याव्यापी आंदोलन छेडले जाईल.

गुलाबराव डेरे म्हणाले, शासनाच्या वतीने अतिरिक्‍त दुधाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. वास्तविक राज्यामध्ये कोणतेही अतिरिक्‍त दूध नाही. शेतकर्‍यांकडून दूध खरेदी करताना 3.5 ही फॅट असली पाहिजे, असा नियम आहे. संकलित केलेले दूध ग्राहकाला विकताना मात्र दुधाच्या फॅटबद्दल हा नियम नाही. राज्य शासनाने 2001 मध्येच टोन व डबल टोन ही पद्धत लागू केली आहे. त्यानुसार 1.5 फॅटचे दूध ग्राहकाला वितरीत केले जात आहे. दूध प्रक्रि या करणार्‍या खाजगी संस्थांना दुधाच्या एका टँकरचे तीन टँकर दूध करून विकण्यास परवानगी दिली आहे. दुधातील भेसळ थांबविण्यासाठी अन्न व औषधे प्रशासनाकडे पुरेशे मुनष्यबळ नाही. ‘इन्स्पेक्टर’ राजमुळेही भेसळयुक्‍त दूध सर्रास बाजारात येत आहे. शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या दुधाच्या तिप्पट दूध बाजारात येत आहे. 

ग्राहक आजही शहर व परिसरातील मोठ्या उत्पादक शेतकर्‍यांकडून म्हैशीचे दूध 60 तर गायीचे दूध 40 रुपये लिटरने खरेदी करत आहेत. ग्राहकांना लिटरमागील पैशांऐवजी खात्रीशीर व भेसळ विरहित दूध पाहिजे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.