Tue, Mar 26, 2019 07:39होमपेज › Ahamadnagar › आक्षेपार्ह वक्तव्याचे शहरात उमटले तीव्र पडसाद!

आक्षेपार्ह वक्तव्याचे शहरात उमटले तीव्र पडसाद!

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 12:41AMनगर : प्रतिनिधी

भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे शहर व परिसरात तीव्र पडसाद उमटले. महापालिकेसमोर तसेच केडगावला रास्तारोको करण्यात आला. नालेगावात छिंदम यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. शिवसेना-राष्ट्रवादीतर्फे शहरात निषेध फेरी काढून माळीवाड्यातील शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी छिंदम यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निवेदन दिले. शिवसेनेने दिल्लीगेटला तर राष्ट्रवादीने माळीवाडा वेशीसमोर छिंदम यांच्या पुतळ्याचे दहन केले.

 शिवसेनेने जाळला पुतळा

मनपाच्या बांधकाम विभागातील कर्मचार्‍याला छिंदम यांनी फोनवरून शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरल्याची बातमी शहरभर पसरताच  शिवसैनिकांनी ‘शिवालया’कडे धाव घेतली. माजी आ. अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर करत माळीवाड्यातील छत्रपतींच्या पुतळ्यास दुधाने अभिषेक घातला. तेथून घटनेचा निषेध करत शिवसैनिकांनी छिंदम यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी घटनेच्या निषेधार्ह जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दिल्लीगेटला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. राठोड यांच्यासह नगरसेवक योगीराज गाडे, विक्रम राठोड, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, अनिल शिंदे, भगवान फुलसौंदर, दत्ता कावरे, आशा निंबाळकर, राजू जाधव, गणेश कवडे आदींसह नगरसेवक व शिवसैनिक सहभागी झाले होते. राठोड यांनी दिल्लीगेट वेशीजवळ निषेध सभा घेतली.  यावेळी छिंदम यांच्या राजीनाम्यासह अटक करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. भाजपकडून छिंदम यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.

 राष्ट्रवादीकडून पुतळ्याला चपलेचा मार

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप नंतर आयुर्वेद महाविद्यालय येथील आ. संग्राम जगताप यांच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले. शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरणार्‍या उपमहापौर छिंदम यांच्या विरोधात नारेबाजी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माळीवाड्यातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घातला. तेथून माळीवाडा वेशीजवळ येत कार्यकर्त्यांनी छिंदम यांच्या पुतळ्यास चपलेचा मार देत दहन केले. छिंदम यांच्या वक्तव्यातून भाजप, संघाचा अजेंडा दिसत असल्याचा आरोप करत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीगेटला धाव घेऊन निषेध सभा घेतली. सभेनंतर कार्यकर्त्यांनी सावेडी उपनगरात निषेध फेरी काढली. यात उबेद शेख, सुरेश बनसोडे, कुमार वाकळे, वैभव ढाकणे, अनुराधा येवले, दादा दरेकर, गजानन भांडवलकर, निलेश बांगरे, वैभव वाघ आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 नालेगावात काढली अंत्ययात्रा

शहरात शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरल्याची बातमी पसरल्यानंतर नालेगाव परिसरात शिवप्रेमी चांगलेच संतप्त झाले होते. येथील पैलवान राम नळकांडे यांच्या नेतृत्वाखाली उपमहापौर श्रीपाद छिंदम यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अंतिम चौकातून तिरडी तयार करून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. दिल्लीगेट येथील छिंदम यांच्या कार्यालयासमोर अंत्ययात्रा नेण्यात आली. यावेळी तिरडीला अग्नी देण्यात आला.

 केडगावात रस्ता रोको

शहरातील घटनेचे पडसाद उपनगर असलेल्या केडगावातही दिसून आले. केडगावात नगर-पुणे रस्त्यावर रास्तारोको करून छिंदम यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यात विशाल कोतकर, भूषण गुंड, गणेश सातपुते, बच्चन कोतकर, सुनील कोतकर, गणेश साळुंके, निलेश राऊत, अजय कोतकर, माउली कोतकर आदी सहभागी झाले होते. केडगाव - सोनेवाडी चौकात मनोज कोतकर मित्र मंडळ व शिवमुद्रा ग्रुपच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात अजित कोतकर, गोरख गुंड, ओंकार कोतकर, भरत मतकर, लकी सातपुते, संदीप गायकवाड, उमेश ठोंबरे, अनिकेत साठे आदींसह शिवप्रेमी सहभागी झाले होते. यावेळी छिंदम यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

 छिंदम यांना जागा दाखविणार : मावळा प्रतिष्ठान

एका शुल्लक कामासाठी शिवरायांबद्दल अपशब्द काढणार्‍या श्रीपाद छिंदम यांना येत्या काळात त्यांची जागा दाखवून देणार असल्याची प्रतिक्रिया मावळा प्रतिष्ठानचे दानिश शेख यांनी दिली. येत्या निवडणुकीत छिंदम उभे राहिल्यास त्यांच्या गैरकारभाराचा पाढा जनतेसमोर वाचण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

आज भिंगार बंद 

उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा भिंगारमध्ये सकल मराठा समाजातर्फे निषेध करण्यात आला. नागरिकांनी भिंगार पोलिस ठाण्यात जाऊन निवेदन दिले. वक्तव्याचा निषेध करत सकल मराठा समाजातर्फे आज भिंगार बंदचे आवाहन करण्यात आले आहे.