Mon, May 20, 2019 08:05होमपेज › Ahamadnagar › स्थायी समितीत घमासान, अधिकारी ‘तोंडघशी’!

स्थायी समितीत घमासान, अधिकारी ‘तोंडघशी’!

Published On: May 18 2018 1:13AM | Last Updated: May 17 2018 11:39PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत पदाधिकार्‍यांच्या आक्रमक मार्‍यापुढे अधिकारी तोंडघशी पडल्याचे दिसून आले. अखर्चित निधीवरून घमासान झाले असतांना, बैठक संपली तरी अखर्चित निधीचा आकडा जुळत नव्हता. त्यामुळे स्वतः मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना सभेनंतर सर्व विभागांचा आढावा घेण्याची वेळ आली.

स्थायी समितीची सभा अध्यक्षा शालिनी विखे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेस सभापती कैलास वाकचौरे, उमेश परहर, सदस्य संदेश कार्ले, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच अखर्चित निधीवरून अधिकार्‍यांना धारेवर धरण्यात आले. मागील आर्थिक वर्षात झालेल्या कामनिहाय कामांच्या माहितीचा कागद समोर ठेऊनच अखर्चित निधीचा आढावा घेण्याची मागणी सदस्यांनी केली. अखर्चित निधीची संपूर्ण माहिती दिल्याशिवाय अधिकार्‍यांनी बाहेर न जाण्याचा इशारा संदेश कार्ले यांनी दिला. यावेळी अधिकार्‍यांकडे अपूर्ण माहिती असल्याने पूर्ण माहिती घेण्यासाठी धावपळ सुरु झाली.

आपापल्या विभागात जात अधिकार्‍यांनी अखेर माहिती आणली. मात्र अर्धवट माहिती असल्याने पदाधिकार्‍यांनी पूर्ण माहितीची मागणी केली. अनेकांनी आकडेवारी दिल्यानंतर ‘इतका मोठा निधी अखर्चित कसा राहिला’? असा प्रश्न पदाधिकार्‍यांनी विचारल्यावर ‘खालचे अधिकारी, कर्मचारी काम करत नाहीत’, असे उत्तर अधिकार्‍यांकडून मिळाले. अखेर स्थायी समितीची बैठक संपली तरी परिपूर्ण माहिती पदाधिकार्‍यांना मिळालीच नाही. त्यामुळे स्थायी व जलव्यवस्थापन समितीची सभा संपल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना विभागनिहाय आढावा घ्यावा लागला.

सर्वसाधारण सभेत गाजलेल्या शेवगाव तालुक्यातील बंधार्‍याच्या कामाचा विषय स्थायीच्या सभेत चर्चेला आला. गेल्या अनेक सभांपासून हा विषय सातत्याने येत असल्याने सुनील गडाख यांनी नाराजी व्यक्त केली. देहेर्‍यात बंधार्‍याचे ठिकाण सदस्यांना विचारात न घेता परस्पर बदलण्यात आले. त्याला प्रशासकीय मान्यता नसतांनाही काम सुरु करण्यात आले, यावरही सभेत चर्चा झाली.भानसहिवरा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम करण्यात येत आहे. औरंगाबाद येथील एका ठेकेदाराकडे हे काम आहे. काम करण्याची मुदत संपली तरी ठेकेदाराला नोटीस न दिल्याबद्दल संदेश कार्ले यांनी नाराजी व्यक्त केली. ठेकेदारावर कारवाई करण्याचीही मागणी केली. कर्जत तालुक्यातील नागापूर गावठाण मध्ये एकाच सिमेंट बंधार्‍याची दोन वेळेस इस्टिमेट करण्यात आले. एकच काम दोन वेळेस दाखविण्यात आले. ही बाब उघड झाल्यानंतर सभेत कार्यकारी अभियंत्यांना विचारणा केली असता तालुका स्तरावरून दोन इस्टिमेट आले. दोन इस्टिमेट असल्याने कामेही दोन असतील, म्हणून मंजुरी दिल्याचे बेजबाबदार उत्तर अधिकार्‍यांनी दिले.

शिर्डी संस्थानवर काढणार ‘पायी दिंडी’

जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी 10 कोटी रुपये देण्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांचे निर्देश असतांना साईबाबा संस्थान मात्र निधी देण्यास कुचराई करत आहे. त्यामुळे संस्थानच्या अध्यक्षांसह अधिकार्‍यांना देवाने सद्बुद्धी द्यावी यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी नगर ते शिर्डी पायी दिंडी आठवडाभरात काढण्यात येणार आहे. विदर्भात कोट्यवधींचा निधी शिर्डी संस्थानने दिला असतांना जिल्ह्यातल्या शाळा खोल्यांसाठी निधी देण्यात येत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संदेश कार्ले यांनी दिली.

मुद्रणालय कर्मचार्‍यांसाठी 70 लाख

जिल्हा परिषदेच्या मुद्रणालयातील कर्मचार्‍यांचे सन 1989 पासूनचे पगार व्याजासह कर्मचार्‍यांना देण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. कर्मचार्‍यांना भरपाईसाठी तहसीलदारांनी जिल्हा परिषदेच्या मालमत्तेवर बोजा चढविला आहे. भरपाई न दिल्यास जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचा लिलाव होऊ शकतो. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या भरपाईपोटी 69 लाख 99 हजार रुपयांची तरतूद स्थायीच्या सभेत करण्यात आली.