Tue, Mar 26, 2019 01:35होमपेज › Ahamadnagar › मुद्रांक नोंदणी कार्यालयात पिसवा अन् उंदीर!

मुद्रांक नोंदणी कार्यालयात पिसवा अन् उंदीर!

Published On: Jan 21 2018 2:43AM | Last Updated: Jan 20 2018 10:34PMनगर : प्रतिनिधी

शहरातील सहजिल्हा निबंधक वर्ग- तथा मुद्रांक जिल्हाअधिकारी कार्यालयात घाणीच्या साम्राज्यामुळे पिसवा, विषारी किडे, उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांच्या उपद्रवामुळे कार्यालयातील कार्मचार्‍यांना काम करणे अवघड झाले आहे.सहनशक्तीचा अंत झाल्याने या कर्मचार्‍यांनी काल (दि.20) कार्यालयाबाहेर ठाण मांडून धरणे आंदोलन केले. 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एका कोपर्‍यामध्ये हे मुद्रांक नोंदणी कार्यालय आहे. ब्रिटीशकालीन जुनी इमारत असल्याने या इमारतीची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. मुद्रांक नोंदणी कार्यालयाची इमारत म्हणजे अडगळीची खोली असल्यासारखी अवस्था झालेली आहे. या इमारतीच्या डागडुजीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. या कार्यालयात पिसवा, विषारी किडे, उंदरांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. वरचा भाग तुटल्याने कर्मचारी काम करत असताना मेलेली मांजरे, उंदरही त्यांचा अंगावर पडतात. काही कर्मचार्‍यांना पिसवांनी चावा घेतल्याने ते आजारी पडत आहेत. घाणीच्या साम्राजामुळे दुर्गंधीही पसरली आहे. कार्यालयात कामानिमित येणार्‍या नागरिकांनाही या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

शासनाला सर्वाधिक महसूल देणार्‍या कार्यालयासाठी नवीन जागा मिळावी, म्हणून या कार्यालयाच्या प्रमुखांकडून अनेकदा पाठपुरावा करण्यात आला मात्र, याबाबत दखल घेतली जात नसल्याने त्यांचेही हात टेकले असल्याचे या कार्यालयातील कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. या कार्यालयात काल (दि.20) सकाळी पेस्ट कंट्रोल करत फवारणी करण्यात आली. या विषारी रसायनाच्या उग्र वासाने कार्यालयात बसणे अवघड झाल्याने कर्मचार्‍यांनी अखेर कार्यालयाबाहेर ठाण मांडत धरणे आंदोलन केले.